Join us

कर्जत-लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच; सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी बोर्डाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:14 IST

नवीन मार्गाबरोबरच नवी स्थानकेही उभारण्यात येणार असल्याने त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद करता यावा म्हणून कर्जत-लोणावळ्यादरम्यान दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेने तयार केले आहेत. ते रेल्वे बोर्डाला सादर केले असून, मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व भागात कर्जत -लोणावळा आणि उत्तर पूर्व भागात कसारा- इगतपुरी या दोन प्रमुख घाट मार्गावर प्रत्येकी दोन नवीन ट्रॅक उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यापैकी कर्जत-लोणावळा भागातील मार्गासाठी दोन मार्गासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. 

दोन्ही मागिंकांसाठी स्वतंत्र बोगदेरेल्वेच्या प्रस्तावानुसार या प्रकल्पात भुयारी मार्ग आणि पुलांचा समावेश असेल. या प्रस्तावात काही एकेरी बोगदे असतील आणि त्यातून दोन्ही मार्गिका जातील, तर काही ठिकाणी दोन्ही मार्गिकांसाठी स्वतंत्र बोगदे असतील. सध्याचा मार्ग २६ किमीचा असला तरी नवीन मार्ग साधारण त्याहून दुप्पट लांबीचा असेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणेदरम्यान अतिरिक्त मार्गिका तयार होणार असून, सेवांमध्ये वाढ करणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नवीन मार्गाबरोबरच नवी स्थानकेही उभारण्यात येणार असल्याने त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

नवीन मार्गावर चढ-उतार नसल्याने रेल्वेला अतिरिक्त बँकर इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बँकर जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी लागणारा सुमारे २०-२० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

टॅग्स :रेल्वेलोणावळा