Join us

चारशेवर शिक्षकांना काेराेनाची बाधा; विद्यार्थी आणि पालकांमध्येही भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 05:42 IST

उद्यापासून शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम; स्थानिक पातळीवर गाेंधळ

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई, ठाणे, पुणे वगळता राज्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असताना चारशेवर शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळेत शिकवायला जाणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यात अनेक ठिकाणी शिक्षकच कोरोनाबाधित आढळल्याने एकूणच शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर मोठा संभ्रम आहे. 

विदर्भात सर्वाधिक २०० शिक्षक बाधित आढळले आहेत. मराठवाड्यात ९७, खान्देशात २३ तर पश्चिम महाराष्ट्रात १३२ शिक्षक बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी चाचण्यांमध्ये एकही शिक्षक कोरोनाबाधित आढळलेला नाही. 

शिक्षणमंत्री म्हणाल्या, शाब्बास सोलापूरकर !सोलापूर जिल्ह्यात मिळालेला प्रतिसाद पाहून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले असून त्यांनी ‘शाब्बास सोलापूरकर’ या शब्दात सोलापूरच्या पालकांचे आभार मानले आहेत. ८२ टक्के पालकांची शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या चाचण्यांचे काय?शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ‘थर्मल स्कॅनिंग’ करायची आहे. केवळ ‘थर्मल स्कॅनिंग’ने कोरोना डिटेक्ट होईल का, असाही सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर संस्थाचालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भात नकार आहे. बहुतांश पालकसुद्धा मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सोयी-सुविधांचा अभाव आहे. प्रशासन साहित्य पुरवायला तयार नाही. आता शिक्षण विभागानेही हात वर केले आहेत. 

२७ नोव्हेंबरनंतर संख्या वाढू शकतेरेमडेसिवीरबद्दल हे औषध मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णांना उपयोगी ठरत आहे. त्यामुळे ते बंद करून चालणार नाही. २६ ते २७ नोव्हेंबरनंतर मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढेल, असे मत टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केले.     -वृत्त/स्टेट पाेस्ट

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पालकांशी चर्चा करून व रूग्णांची सद्यःस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याशाळा