हल्ल्यानंतर करिनाचा पोलिसाला फोन, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:40 IST2025-01-21T11:40:00+5:302025-01-21T11:40:12+5:30
Saif Ali Khan Attack Update: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. करिनाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हल्ल्यानंतर करिनाचा पोलिसाला फोन, पण...
मुंबई - सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरने एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. करिनाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हल्लेखोर मोहम्मद शरिफूल पोलिस कोठडीत आहे. हल्ला झाला त्या रात्री करिनाने आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने करिनाने रुग्णालयात धाव घेतली. तिथे गेल्यानंतर पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळाली. मात्र, करिनाने आधीच १०० या पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता तर नाकाबंदी करून आरोपीला लगेचच पकडता आले असते, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुलांची खेळणी का हलवली?
सैफ अली खान राहत असलेल्या सद्गुरु शरण इमारतीमधून सोमवारी दुपारी त्याच्या मुलांची खेळणी हलवताना कामगार दिसले. सैफच्या घरात सध्या फ्लोरिंगचे काम सुरू असल्याने त्यामुळे ही शिफ्टिंग सुरू आहे का? याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे सैफवर हल्ला झाल्या नंतर सुरक्षेचे तीन १३ वाजलेल्या इमारतीमधून सैफ आणि कुटुंबीय शिफ्ट होत आहेत का अशीही चर्चा सुरू झाली.
सराईत गुन्हेगार
- सैफ राहत असलेल्या इमारतीच्या कॉरिडॉर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षारक्षकांपैकी एक जण केबिनमध्ये तर दुसरा गेटवर झोपला होता, असे तपासात उघड झाले आहे.
- परिणामी आरोपी हा १० व्या मजल्यापर्यंत शिड्यांनी तर अकरावा मजला डक परिसरातून पाईपने चढला. आवाज होऊ नये म्हणून स्वतःचे बूट त्याने बॅगमध्ये ठेवले. त्याने पळताना कपडे बदलले, स्वतःचा फोन बंद ठेवला.
-या सगळ्यावरून बांगलादेशमध्येही हा सराईत गुन्हेगार असावा, असा संशय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शरीफुलला पुन्हा सद्गुरू शरण इमारतीमध्ये नेऊन सैफवर केलेल्या हल्ल्याचे पोलिस रिक्रिएशन करणार आहेत. त्यामधूनही बरीच माहिती उघड होईल, असे तपास अधिकारी म्हणाले.
फेस रेकग्नायजेशन ॲपची मदत !
आरोपी अपार्टमेंटमधून तोंडावरचा कपडा काढून पळाला होता. पोलिसांनी फेस रेकग्नायजेशन ॲपच्या मदतीने अंधेरी ते वांद्रे परिसरात त्याचा शोध घेतला. तो १ आणि ९ जानेवारीला अंधेरीमध्ये दिसला. ९ जानेवारीचे फुटेज तपासल्यावर अंधेरीत ज्या लेबर कंत्राटदारासोबत गेला त्याच्या गाडीच्या नंबरप्लेटवरून पोलिस कंत्राटदारापर्यंत पोहोचले. त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.