लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलापूर, शीळफाटा, महापे, घनसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महिनाअखेरपर्यंत टेंडर (स्वारस्य निविदा) काढली जाणार आहेत. सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ३८ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार असून, घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेनंतर मुंबईतील दुसरी पीपीपी तत्त्वावरील मेट्रो मार्गिका ठरणार आहे.
मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून, तिच्यावर एकूण १५ स्थानके असतील. या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून, घनसोलीपर्यंत ती भूमिगत असेल. हा मार्ग ठाणे खाडी खालून जाणार आहे. ठाणे खाडी परिसरात या मेट्रो मार्गिकेची लांबी जवळपास ५.७ किमी असेल. तर, घनसोली ते बदलापूर हा मार्ग उन्नत असेल. या मार्गिकेचा ४.३८ किमी लांबीचा मार्ग पारसिक हिल भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मिलान मेट्रो या इटालियन कंपनीने तयार केला आहे. हा डीपीआर आयआयटी मुंबईकडून तपासून घेऊन एमएमआरडीएने अंतिम केला आहे.
सुरुवातीला या मेट्रो मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यानंतर यातील पात्र कंपन्यांकडून रिक्वेस्ट फॉर कोटेशन आणि विनंती प्रस्ताव मागविण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
अशी असेल मेट्रो १४
मार्ग : कांजूरमार्ग - घणसोली, महापे, अंबरनाथ, बदलापूरलांबी : सुमारे ३८ किमीप्रकल्प खर्च : सुमारे १८ हजार कोटीअपेक्षित प्रवासी संख्या : ७ लाख
फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून जाणार
ही मेट्रो मार्गिका संवेदनशील अशा ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून जात आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली आहे. सल्लागारच पर्यावरण मंजुरी घेण्याचेही काम करेल. त्यामुळे कंत्राटदार अंतिम करेपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. या मेट्रो मार्गिकेचा डीपीआर तयार करणारी मिलान मेट्रो सल्लागार कंपनीही मेट्रो मार्गिका पीपीपी तत्त्वावर उभारण्यासाठी इच्छुक आहे. निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी या कंपनीने एमएमआरडीएला यापूर्वीच विनंती केली आहे.