Join us  

कंगना- हृतिक वादाला नव्याने तोंड फुटले!, हृतिक चे सोशल मीडियावरून उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 4:56 AM

बॉलिवुड अभिनेते कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या वादाला आता नव्याने तोंड फुटले आहे. कंगनाने आतापर्यंत केलेल्या आरोपांना हृतिकने सोशल मीडियावरून सडेतोड उत्तर दिले असून

मुंबई : बॉलिवुड अभिनेते कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या वादाला आता नव्याने तोंड फुटले आहे. कंगनाने आतापर्यंत केलेल्या आरोपांना हृतिकने सोशल मीडियावरून सडेतोड उत्तर दिले असून, त्याची घटस्फोटीत पत्नी सुएझ खान हिनेही त्याची ट्विटरच्या माध्यमातून पाठराखण केली आहे.‘मी आतापर्यंत गप्प होतो, याचा अर्थ मला सर्व आरोप मान्य होते असे नाही. कंगनाला मी कधीही एकांतात भेटलो नाही. ती ज्या नात्याबद्दल बोलते आहे, ते कधीही अस्तित्वात नव्हते,’ असे हृतिकने फेसबुक तसेच ट्विटरवरून म्हटले आहे.आप की अदालत या कार्यक्रमात कंगनाने आदित्य पांचोलीपासून हृतिक रोशनपर्यंत अनेकांसोबत असलेल्या आपल्या नात्याबद्दल उघडपणे वक्तव्य केले होते. हृतिकसोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर त्याने लग्नासाठी नकार दिला आणि माझे पर्सनल मॅसेज आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली, असे कंगना या कार्यक्रमात म्हणाली. हृतिकने माझी माफी मागावी, असेही तिचे म्हणणे होते.या तिच्या मुलाखतीनंतर कंगना वेडी असल्याची प्रतिक्रिया आदित्य पांचोलीने दिली होती. तसेच तिला त्याने मानहानीची नोटिस देखील पाठवली. पण या सगळ्यात हृतिक प्रचंड शांत होता. पण आता तिच्या मुलाखतीच्या अनेक दिवसानंतर हृतिकने एक स्टेटमेंट प्रसिद्ध केले आहे. यात कंगनाच्या नावाचा उल्लेख टाळत ‘वुमन इन क्वेश्चन’ असा उल्लेख त्याने केला आहे. ‘सतत चर्चेत असलेल्या त्या लेडीला मी आयुष्यात खासगीत कधीच भेटलेलो नाही. मी तिच्यासोबत काम केलेय, हे खरे आहे. पण सीक्रेट मीटिंग म्हणाल तर हे खोटे आहे,’ असे हृतिकने म्हटले आहे. तसेच ‘मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. अफेअरच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मी हे सगळे बोलत नाहीय. पण दुदैवाने मीडिया आणि लोकांना सत्य गोष्टींऐवजी खोट्या गोष्टींवर चटकन विश्वास बसतो. मी तिच्यासोबत जानेवारी २०१४ मध्ये साखरपुडा केला असा माझ्यावर आरोप आहे. पण याचा एकही पुरावा नाही. जानेवारी २०१४ मध्ये मी देशाबाहेर गेलोच नव्हतो. माझे पासपोर्ट डिटेल्स याचा पुरावा आहेत. काही फोटोशॉप केलेले फोटो पुढे करून ^‘सो कॉल्ड’ रिलेशनशिपच्या कथा रचल्या जात आहेत. सत्य काय ते जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका,’ असेही हृतिक म्हणाला आहे.हृतिकच्या या स्टेटमेंटवर कंगना अद्याप काहीही बोललेली नाही. पण कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने, हृतिकने कंगनाला पाठवलेला एक कथित ई-मेल सार्वजनिक केला आहे. ‘तू आणि मी सर्वसामान्य कपल्ससारखे नसून आपले आयुष्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहे,’ असे हृतिकने या मेलमध्ये म्हटले आहे. या ईमेलचा स्क्रिनशॉट रंगोलीने शेअर केला आहे. रंगोलीने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘कुठल्याही चर्चांना वाव देण्यासाठी हा स्क्रिनशॉट नाही. हे ईमेल्स लॅपटॉपवरून नाही, तर आयपॅडवरून लिहिले आहेत, हे मला सांगायचेय. हृतिकने आपला लॅपटॉप फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेशनसाठी दिलाय. आयपॅड दिलेला नाही. विचार करा, असे का?’

टॅग्स :कंगना राणौतहृतिक रोशनसोशल मीडियाट्विटर