Join us
Daily Top 2Weekly Top 5

महानगर दंडाधिकाऱ्यांचा कंगनाला दिलासा नाही; सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 07:39 IST

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल फौजदारी मानहानी दावा अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची कंगना रणौतची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी  गुरुवारी फेटाळली.

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल फौजदारी मानहानी दावा अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची कंगना रणौतची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी  गुरुवारी फेटाळली. ज्या दंडाधिकाऱ्यांसमोर या दाव्यावर सुनावणी सुरू आहे, त्यांच्यावर माझा विश्वास नाही. जामीनपात्र गुन्ह्याच्या सुनावणीस उपस्थित राहिले नाही तर अजामीनपात्र वॉरंट जारी  करू, असे सांगून ते एकप्रकारे धमकावत आहेत. त्यामुळे या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्यात यावी, असे कंगनाने अर्जात म्हटले होते.कंगनाने केलेल्या अर्जात काहीही तथ्य नसल्याचे म्हणत अख्तर यांच्या वकिलांनी कंगनाचा अर्ज फेटाळण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. दाव्यावरील सुनावणीला विलंब करण्यासाठी कंगना असे अर्ज करीत असल्याचा आरोपही अख्तर यांच्या वकिलांनी केला. या दाव्यावरील सुनावणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांपुढे सुरू आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी कंगनाचा अर्ज फेटाळला.एका मुलाखतीत कंगनाने आपल्यावर वाटेल तसे आरोप करून आपली बदनामी केली, त्यामुळे आपली प्रतिष्ठा मलिन झाली, असे म्हणत अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला. दरम्यान, कंगनानेही अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात जावेद यांच्याविरोधात  खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे. कंगनाने तक्रारीत म्हटले की, माझा सहकलाकाराबरोबर वाद झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी मला व माझ्या बहिणीला घरी बोलावून धमकावले. तसेच अख्तर यांनी मला जबरदस्तीने ‘त्या’ सहकलाकाराची माफी मागायला लावली.

टॅग्स :कंगना राणौतजावेद अख्तर