मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान कांदिवलीच्या स्व. गोपीनाथ मुंडे उद्यानाला - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 12, 2022 18:15 IST2022-12-12T18:10:15+5:302022-12-12T18:15:08+5:30
मंत्री लोढा म्हणाले की, आमदार भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व विधानसभेत विविध विकास कामे झाली आहेत. आत्तापर्यंत वांद्रे येथील जिओ उद्यान हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते, मात्र गोपीनाथ मुंडे उद्यान हे त्यापेक्षाही सुंदर आणि दर्जेदार असे झाले आहे.

मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान कांदिवलीच्या स्व. गोपीनाथ मुंडे उद्यानाला - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई - कांदिवली पूर्व विधानसभेतील लोखंडवाला संकुल येथे उभारण्यात आलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान हे मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यान ठरले आहे. स्थानिक भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे उद्यान म्हणजे एखादा प्रकल्प अधिकाधिक सुंदर आणि लोकोपयोगी कसा होईल हे दर्शवणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री तथा उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, आमदार भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व विधानसभेत विविध विकास कामे झाली आहेत. आत्तापर्यंत वांद्रे येथील जिओ उद्यान हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते, मात्र गोपीनाथ मुंडे उद्यान हे त्यापेक्षाही सुंदर आणि दर्जेदार असे झाले आहे.
यावेळी खा. गोपाळ शेट्टी म्हणाले की, येथील गोपीनाथ मुंडे उद्यानामुळे कांदिवली पूर्व विधानसभेच्या सौदर्यात भर पडली आहे. अत्यंत उपयुक्त अस प्रकल्प आ. अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे.
आमदार अतुल भातखळकर म्हणाले, येथील पाच एकरच्या भूखंडावर जंगल होते. परिसर अस्वच्छ होता. येथील नैसर्गिक सौंदर्य कोठेही नष्ट न करता आम्ही हे उद्यान बनवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे विलोभनीय शिल्प साकारण्यात आले आहे. मुंबईतील पहिला वहिला अंडरग्राउंड पार्किंगचा पायलेट प्रोजेक्ट येत्या काळात पूर्ण होईल. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मागाठणे ते गोरेगाव हा डीपी रोड येणाऱ्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्रास्ताविक माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी केले सूत्रसंचालन भाजपा उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केले तर आभार अश्विन अहिरे यांनी मानले.यावेळी मंडलाध्यक्ष आप्पा बेलवलकर यांसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.