आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:08 AM2024-03-05T10:08:10+5:302024-03-05T10:10:59+5:30

गोरेगाव पूर्व ते कांदिवली पूर्व लोखंडवाला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, भविष्यात हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल.

kandival to mulund in just half an hour the traffic jam will be less in mumbai | आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी  

आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी  

मुंबई : गोरेगाव पूर्व ते कांदिवली पूर्व लोखंडवाला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, भविष्यात हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल. हा रस्ता झाल्यावर तो भविष्यात गोरेगाव - मुलुंड लिंक रोडला जोडण्यात य़ेणार आहे. त्यामुळे कांदिवली ते मुलुंड हे अंतर २५-३० मिनिटांत पार करता येईल. पश्चिम व पूर्व उपनगराला जोडणारा हा रस्ता तयार झाल्यावर येथील वाहतूककोंडी कमी होणार आहे.

महानगरपालिकेने कांदिवली पूर्व लोखंडवाला ते गोरेगाव पूर्व या कनेक्टिव्हिटी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मालाड पूर्वेकडील पी उत्तर दिशेने ५०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण करून सुरुवात केली आहे. नवीन कनेक्टिव्हिटीमध्ये पूल आणि काँक्रिटचे रस्ते असतील जे १२० फूट रुंद असतील. कांदिवली पूर्व लोखंडवाला ते गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणारा हा पालिकेचा ‘महत्त्वाचा प्रकल्प’ आहे. 

पी उत्तर विभागाने सुमारे ५०० मीटर अडथळे दूर केले आहेत. या प्रकल्पामुळे एकूण १,३७६ बांधकामे प्रभावित होतील, त्यापैकी ७१ वनक्षेत्रातील आणि उर्वरित पालिकेच्या जमिनीवर असतील. सुमारे ८६० मीटर रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जातो. पी उत्तर विभागाच्या टीमने दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पाडलेल्या कारवाईदरम्यान मालाड पूर्वेतील सध्याचा ३० फूट रस्ता १२० फूट रुंद करण्यासाठी १६८ बांधकामे पाडली. त्यापैकी १०७ बांधकामे पुनर्वसनासाठी पात्र ठरली. या १०७ वास्तूंपैकी ८५ निवासी आणि २२ व्यावसायिक वास्तू होत्या. आम्ही जवळच्या मालाड पूर्व आणि गोरेगाव पूर्व भागात ८०० - ९०० लोकांचे पुनर्वसन केले आहे.- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग

या प्रकल्पासाठी आपण २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा केला असून, विधानसभेत अनेकवेळा आवाज उठवला आहे. पालिका प्रशासन आणि शासनाच्या संबंधितांबरोबर बैठकादेखील घेतल्या आहेत. त्याचे फलित म्हणून या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. दिंडोशी मतदारसंघातील या नवी कनेक्टिव्हिटीमुळे भविष्यात प्रवाशांच्या वेळेत आणि इंधनातही मोठी बचत होईल. गोरेगाव पूर्व रत्नागिरी हॉटेल ते मालाड जलाशय - लोखंडवाला टाउनशिप यांना जोडणारा हा रस्ता पश्चिम उपनगरातील रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग म्हणून आधारवड ठरेल.- सुनील प्रभू, आमदार, माजी महापौर, दिंडोशी

Web Title: kandival to mulund in just half an hour the traffic jam will be less in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.