Join us  

काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाईंनी केलं अभिनेत्रीचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 9:26 PM

काम्या यांच्या प्रवेशावेळी भाई जगताप यांच्यासह युवक नेते सुरजसिंह ठाकूर आणि कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सापरा यांनी काम्याचे पक्षात स्वागत केले.

ठळक मुद्देकाम्या दीर्घकाळापासून राजकारणात येण्यावर विचार करत होती. सप्टेंबर 2021 मध्ये ‘शक्ती-अस्तित्व के अहसास की’ हा शो संपल्यानंतर तिने यावर गंभीरपणे विचार सुरू केला. 

फिल्म इंडस्ट्री आणि राजकारण हे समीकरण नवं नाही. अ‍ॅक्टिंग सोडून राजकारणात रमलेले अनेक कलाकार आहेत. आता या यादीत टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबी हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. आपल्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी काम्या पंजाबी या अभिनेत्रीने काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतकाँग्रेसचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला. 

काम्या यांच्या प्रवेशावेळी भाई जगताप यांच्यासह युवक नेते सुरजसिंह ठाकूर आणि कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सापरा यांनी काम्याचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशाचे फोटो आता ट्विटरवरुन समोर आले आहेत. काम्या दीर्घकाळापासून राजकारणात येण्यावर विचार करत होती. सप्टेंबर 2021 मध्ये ‘शक्ती-अस्तित्व के अहसास की’ हा शो संपल्यानंतर तिने यावर गंभीरपणे विचार सुरू केला. 

महिला सक्षमीकरणासाठी काम करणार

काम्या यावर म्हणाली, बिग बॉस 13 मध्ये मी तहसीन पूनावालांना भेटली होती आणि त्यांना माझ्या राजकारणात येण्याच्या इच्छेबद्दल कळले. त्यांनी मला प्रोत्साहित केले. मला देशाची सेवा करायची आहे. अनेक मुद्यांवर काम करायचे आहे. महिला सक्षमीकरणावर काम करण्याचा माझा विचर आहे. भूतकाळात मी सुद्धा कौटुंबिक हिंसाचार सहन केला. कदाचित यामुळे राजकारणात येण्याचा विचार माझ्या डेक्यात जन्मला. मला सत्तेची भूक नाही. मला फक्त काम करायचे आहे, असेही ती म्हणाली.

अभिनय सुरूच ठेवणार

राजकारणात आल्यानंतरही मी अभिनय सोडणार नाही. कारण, अभिनय हे माझे पहिले प्रेम आहे. अभिनय आणि राजकारण दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही काम्याने सांगितले. शोचे लीड अ‍ॅक्टर्स अचानक 8 दिवसांच्या सुट्टीवर जातात, हे मी पाहिले आहे. त्यामुळे शो साईन करण्याआधी मी निर्मात्यांना माझ्या राजकीय जबाबदारीची जाणीव देईल आणि तेव्हाच शो साईन करेल. मला अपेक्षा आहे की, या पद्धतीने मी काम करू शकेल, असेही काम्याने स्रष्ट केले.

बिग बॉस मध्येही घेतला होता सहभाग 

काम्या पंजाबीने 2001 साली अ‍ॅक्टिंग करिअरची डेब्यू केली होती. दोन दशकांच्या अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये तिने कहता है दिल, क्यूं होता है प्यार, पिया का घर, अस्तित्व - एक प्रेम कहानी, वो रहने वाली महलों की, बनूं मैं तेरी दुल्हन अशा अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. बिग बॉस सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अन्य काही रिअ‍ॅलिटी शोदेखील तिने केलेत. 

टॅग्स :मुंबईकाँग्रेसअशोक जगतापकाम्या पंजाबी