Join us  

कालिदास नाट्यगृह नाटकासाठी लायक नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 9:32 AM

महाराष्ट्रातील कोणतेही नाट्यगृह बांधण्यापूर्वी अगोदर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे संपूर्ण प्लॅन का येत नाही? हा माझा प्रश्न आहे.

डॉ. गिरीश ओक, अभिनेता, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कालिदास नाट्यगृहात प्रयोग करताना प्रसन्न वाटते. खूप छान देखभाल केली जात असल्याने स्वच्छता असते. नाट्यगृह बांधताना नाटकाला गृहीत धरले जात नाही ही महाराष्ट्रातील बऱ्याच नाट्यगृहांमधील समस्या आहे. कालिदास उभारतानाही याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे स्पष्ट बोलायचे तर कालिदास नाट्यगृह नाटकासाठी लायक नाही. कारण रंगमंचावरचा अँगल खूप वाइड होतो. स्टेज खूप मोठे असल्याने बाजूच्या प्रेक्षकांना नाटक पाहताना त्रास होतो. प्रेक्षकांची पहिली रांग आणि रंगमंचातील अंतर प्रमाणाबाहेर आहे. पहिल्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाला अर्ध्या थिएटरमध्ये बसल्याचा फिल येतो. त्यामुळे मागच्या रांगेतील प्रेक्षकाला रंगमंचावरील काही दिसतच नसेल. खूप मोठी जागा असल्याने तिथे एक हजार आसनक्षमतेचे मुख्य थिएटर आणि दुसरे मिनी थिएटर बांधण्याची गरज होती.

नाट्यगृहाची आखणी करताना प्रशासन कोणत्याही रंगकर्मींचा सल्ला घेतला जात नाही या विषयावर मी नेहमी बोलतो. बांधल्यावर सल्ला घेऊन उपयोग नाही. उदाहरण द्यायचे तर गोव्यातील कला अकादमीचे डिझाइन पोर्तुगीज चर्च बांधणाऱ्या जगद्विख्यात वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी केले आहे; पण त्यांच्या जोडीला रंगकर्मी दामू केंकरे होते. केंकरे हे हाडाचे रंगकर्मी असल्याने त्यांच्या सल्ल्यामुळे इतके परफेक्ट नाट्यगृह बांधले गेलेय की तिथे जाताना कोणालाही एक पायरीसुद्धा चढावी लागत नाही. सेट नेताना त्रास होत नाही. प्रेक्षकांचा अँगलही अफलातून आहे. यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. फक्त अगोदरच व्हिजन असावे लागते. आपल्याकडे बांधकाम झाल्यावर रंकर्मींकडे येतात, पण नंतर स्ट्रक्चरल बदल करता येत नाहीत. हा मुख्य मुद्दा आहे.

ॲकॉस्टिक्सबद्दल फार बोलता येणार नाही

महाराष्ट्रातील कोणतेही नाट्यगृह बांधण्यापूर्वी अगोदर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे संपूर्ण प्लॅन का येत नाही? हा माझा प्रश्न आहे. नितीन नेरूरकर, राजन भिसेंसारखे रंगकर्मी वास्तुविशारदही आहेत. मीरा रोडमध्ये उभारलेल्या लता मंगेशकर नाट्यगृहातील रंगमंचापासून पुढे १५ फूट खोल असल्याने तिथे प्रयोग करणे शक्य होत नाही. भायखळ्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातही १७ फूट खोली आहे. बाजूला गार्डन असल्याने गेट उघडल्यावर सर्वप्रथम डास आत येतात. आपल्याकडे ॲकॉस्टिक्सबद्दल खूपच बौद्धिक दारिद्र्य आहे. त्यामुळे लेपल माइक वापरावे लागतात. त्यामुळे थिएट्रिकल आवाजाचा अनुभव घेता येत नाही. जोरात बोलल्यावर शूट होईल या भीतीने रंगमंचावरील आवाजात चढ-उतार करता येत नाही. सध्या लेपल माइक्सच वापरत असल्याने कालिदासमधील ॲकॉस्टिक्सबद्दल फार बोलता येणार नाही, पण चांगले असेल. मेकअप रूम्स चांगल्या स्थितीत आहेत. वॉशरूममध्ये प्रवेश केल्यावर लाइट्स आपोआप सुरू होतात. सिक्युरिटी गार्डस असूनही बऱ्याचदा कोणीही कुठूनही प्रवेश करतो. याकडे लक्ष द्यावे.

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. कालिदास नाट्यगृहाविषयी प्रख्यात अभिनेता डॉ. गिरीश ओक आपल्या भेटीला आले आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया...

रंगमंच खूप दूर असल्याने पहिल्या रांगेतूनही नाटक नीट एन्जॉय करता येत नाही. प्रेक्षक आणि रंगमंच यांतील अंतर कमी करणे गरजेचे आहे. प्रेक्षकांच्या सोयीसुविधांकडे थोडे आणखी लक्ष द्यायला हवे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून काही सुधारणा करता आल्यास उत्तम होईल.

 

टॅग्स :नाटकगिरिश ओक