कालेलकरांच्या लेखनाने सातत्याने प्रेरणा दिली - राजदत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 15:49 IST2024-03-25T15:49:20+5:302024-03-25T15:49:52+5:30
मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कालेलकरांच्या लेखनाने सातत्याने प्रेरणा दिली - राजदत्त
मुंबई : वैविध्यपूर्ण लेखन करणारे लेखक मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या संहितांनी मराठी रंगभूमीवर दर्जेदार नाटके आणली. त्यांच्या लेखनाने मला सातत्याने चांगले काम करण्याची प्रेरणा दिली. माझ्या अभिनय कारकिर्दीला दिशा देण्याचे मोलाचे सहकार्य करणारा उत्तम माणूस अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते पद्मभूषण राजदत्त यांनी नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
श्री शिवाजी मंदिर येथे नुकताच चार दिवसीय मधूसून कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचा संपन्न झाला. लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदींनी हजेरी लावली. या महोत्सवात कालेलकरांची 'दिवा जळू दे सारी रात, 'डार्लिंग डार्लिंग, 'नाथ हा माझा' हि नाटके सादर झाली. कालेलकर यांच्या जन्मदिनी 'सूर तेचि छेडीता' या कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला.
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या की, अशा महोत्सवांमधून जुनं ते सोनं या उक्तीची अक्षरशः जाणीव होते शिवाय तो काळ... तेव्हाची गाणी, चित्रपट यामुळे एक वेगळाच आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो असेही त्या म्हणाल्या. एक काळ गाजवलेली आणि आजही प्रत्येक वयोगटातील कानसेन आणि गानसेनांना भावणारी गाणी प्रेक्षकांच्या देखील ओठी रुळली हे पाहताना मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांचे डोळे पाणावले.
कलेची आवड जोपासत सिनेगीतांचा कार्यक्रम करणारे कृष्णकांत गावंड, पाच हजारहून अधिक चित्रपटांचा आस्वाद घेत 'मधुघट' हा गीतांचा कार्यक्रम सादर करणारे विवेक पुणतांबेकर, सिनेमाची आवड जपत कालेलकरांवर लघुपट करणारे मांगलेश जोशी, कालेलकरांच्या नाटकावर पीएचडी करून पुस्तक लिहिणाऱ्या भुसावळमधील लेखिका नसीमा देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.