मुंबई : गेल्या १९ वर्षांत खरे आरोपी पकडलेच नाही का? नेमका तपास कसला झाला? असे सवाल उपस्थित करीत ११ जुलै २००६ च्या बॉम्ब ब्लास्टमधील जखमींनी खंत व्यक्त केली. तसेच आज न्यायाची हत्या झाल्याची प्रतिक्रियाही या हल्ल्यात वाचलेल्या ४० वर्षीय चिराग चौहानने दिली. तसेच, या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची गरज असल्याचेही जखमींचे म्हणणे आहे.मीरारोडचे रहिवासी असलेले महेंद्र पितळे यांनी या स्फोटात एक हात गमावला होता. ते सध्या रेल्वेत नोकरीला आहे. ते सांगतात की, आजही तो दिवस आठवला की अंगावर शहारा येतो. नेहमीप्रमाणे विलेपार्लेहूनला घरी जात असताना स्फोट झाला. त्यात शुद्धीवर आलो तेव्हा एक हात नसल्याचे दिसून आले. आजही कृत्रिम हाताचा आधार आहे. घटनेच्या १९ वर्षांनी लागलेला निकाल धक्कादायक आहे. या निकालाने आणखीन अस्वस्थ झालो. आरोपीची सुटका कशी होऊ शकते? नेमका तपास कसा झाला? हे आरोपी नाही तर खरे आरोपी कुठे आहे? यासाठी वरच्या कोर्टात दाद मागण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आजचा दिवस सर्वांसाठी खूप दुःखद आहे! स्फोटातून बचावलेले ४० वर्षीय चिराग चौहान यांनी देखील या निकालावर निराशा व्यक्त केली. चौहान हे सीए आहेत. खार आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान झालेल्या स्फोटात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि तेव्हापासून ते व्हीलचेअरवर आहेत. निकालानंतर काही तासांतच चौहान यांनी सोशल मीडियावर जाऊन निर्दोष मुक्ततेबद्दल आपली व्यथा मांडली. ‘आजचा दिवस सर्वांसाठी खूप दुःखद आहे! न्यायाची हत्या झाली!! हजारो कुटुंबांना झालेले नुकसान आणि वेदनांसाठी कोणालाही शिक्षा झाली नाही!!’ ‘आज देशाचा कायदा अपयशी ठरला, असे ते म्हणाले आहे.