Join us  

मुंबईवर होणारी ‘पर्जन्यफुटी’ जरा वेगळ्या प्रकारची? सत्ताधारी शिवसेनेने उपस्थित केली शंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 7:46 AM

मुंबईवर होणाऱ्या पर्जन्यवृष्टीचा ‘स्वभाव’ बदलत आहे का? मान्सून लहरीच आहे

मुंबई - मुंबईत विकासाची बरीच कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत सतत सुरू असतात. त्यांचाही ‘हातभार’ मुंबई जलमय होण्यासाठी लागत आहे का? मेट्रो आणि इतर बांधकामांमुळे पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यात अडथळे येत असल्याच्या जनतेच्या तक्रारी तर आहेतच. विकासाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, पण काही ‘घडत’ असताना जे आहे ते ‘बिघडत’ आहे का? पावसाची बदलणारी लहर हा मुंबईसाठी गंभीर मुद्दा आहेच, पण त्यामुळे येथे उभा राहिलेला ‘घडलंय बिघडलंय’चा प्रश्नदेखील तितकाच गंभीर आहे असं शिवसेनेनं सामना अग्रलेखातून सांगितलं आहे. 

मुंबईवर होणाऱ्या पर्जन्यवृष्टीचा ‘स्वभाव’ बदलत आहे का? मान्सून लहरीच आहे, पण मुंबईवर कोसळणारा पाऊसही एक-दोन दिवसांत संपूर्ण महिन्याचा पाऊस कोसळण्याइतपत लहरी झाला आहे का? मागील सलग तीन महिन्यांत त्याच्या या लहरीची पुनरावृत्ती का झाली? संपूर्ण महिन्याचा ‘कोटा’ 24-48 तासांत पूर्ण करून मुंबई विस्कळीत करून टाकण्याची ‘सवय’ त्याला का लागली आहे? 26 जुलै 2005 च्या महाजलप्रलयानंतर 4 सप्टेंबर रोजी प्रथमच मिठी नदीने धोक्याची पातळी का ओलांडली? हा कोणत्या धोक्याचा इशारा समजायचा? असा प्रश्न महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला पडला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे

  • पावसाचे ठीक आहे. तो मुंबईवर ‘आली लहर केला कहर’ असा कोसळत आहे. मुंबई जलमय होण्यास हे एक मुख्य कारण आहेच, पण इतरही काही गोष्टी कारणीभूत आहेत. 
  • मुसळधार पावसाच्या तडाख्याने मुंबईला झोडपणे, त्याच काळात भरती असली तर नेहमीच्या सखल भागात पाणी साचणे आणि त्यानंतर लोकलसह रस्ता वाहतूक ठप्प होणे हे चित्र कमी-अधिक प्रमाणात मुंबईत दरवर्षीच दिसते. मात्र या वर्षी मुंबईवर होणारी ‘पर्जन्यफुटी’ जरा वेगळ्या प्रकारची आहे का, अशी शंका घेण्यास वाव आहे. 

  • जून महिन्याचे सुरुवातीचे तीन आठवडे मान्सूनने महाराष्ट्राकडे पाठच फिरवली होती, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने मोठा तडाखा दिला. मुंबईत तर संपूर्ण जून महिन्याची सरासरी पावसाने फक्त 24 तासांत ओलांडली. 
  • फक्त चार-पाच तासांत 375 ते 400 मिलीमीटर एवढा पाऊस मुंबईवर कोसळला. 14 दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा त्या 24 तासांत  मुंबई महापालिकेच्या सहा पंपांनी केला होता आणि 26 जुलै 2005च्या महाजलप्रलयाची पुनरावृत्ती टाळली होती. 

  • इतक्या कमी वेळात एवढा मोठा पाऊस मुंबईत फक्त 1974 मध्येच पडला होता. मात्र अलीकडे ‘कमी वेळात प्रचंड पाऊस’ हे समीकरण अधिक घट्ट होताना दिसत आहे. जुलै महिन्यात मुंबईत ‘रेकॉर्डब्रेक’ पाऊस झाला. ऑगस्टमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली.
  • मान्सून अर्धा असतानाच मुंबईचे वार्षिक लक्ष्य पूर्ण झाले. ठाणे, रायगड, पालघर जिह्यांतही हेच घडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी कमी वेळात प्रचंड पाऊस ही मुंबईच्या पावसाची बदलती लहर मात्र चिंताजनक आहे.  
टॅग्स :शिवसेनामुंबई मान्सून अपडेटपाऊस