जम्बो समिती शोधणार माता, बालमृत्यूची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:54 IST2025-07-15T06:54:07+5:302025-07-15T06:54:16+5:30
आजही विशिष्ट आदिवासी भागात बाल आणि मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामागील नेमकी कारणे शोधून मृत्यू रोखण्याचे उपाय सुचविण्यासाठी विशेष आरोग्य धोरण आखण्याची गरज आहे.

जम्बो समिती शोधणार माता, बालमृत्यूची कारणे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्यातील माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले तरी राज्यभरात ते एकसमान नाही. त्यामुळे राज्याच्या विशिष्ट भागातील नवजात आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूमागील वैद्यकीय आणि अन्य कारणे शोधण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ सदस्यांची जम्बो समिती नेमली आहे. तिच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आहेत.
आजही विशिष्ट आदिवासी भागात बाल आणि मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामागील नेमकी कारणे शोधून मृत्यू रोखण्याचे उपाय सुचविण्यासाठी विशेष आरोग्य धोरण आखण्याची गरज आहे.
त्यामुळे या समितीत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सातज्ज्ञ यांच्या संघटनांच्या प्रतिनिधीचा समावेश असेल. ही समिती दर सहा महिन्यांनी बैठक घेईल आणि शासनास धोरण ठरवण्याची शिफारस करील.
कारणांचे विश्लेषण, निष्कर्ष
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बालमृत्यूंना कारणीभूत ठरलेल्या घटनांचा क्रम तपासणे, त्यांच्या नोंदी घेणे आणि त्यावरून अन्वेषण व विश्लेषण करून निष्कर्ष काढणे. त्यावर उपाययोजना करणे, याअनुषंगाने ही समिती काम करील.
गरोदरपणात आणि प्रसूतीदरम्यान द्यावयाच्या सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याबरोबरच मातांमधील आजारांचे आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करणे शक्य आहे. त्यासाठी सरकारी प्रसूतिगृहे, रुग्णालये आणि ग्रामीण भागात घरी होणाऱ्या माता मृत्यूंबाबत उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही समिती शिफारशी करील.