Join us  

गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 8:30 AM

जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सोशल ग्रुपने गणेशोत्सवासाठी गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' असं गणेशभक्तांना आवाहन करत एक अनोखी योजना अंमलात आणली आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गणेशोत्सव जवळ यायला लागला की आपल्याला वेध लागतात ते गणपतीची भव्य आरास, महाकाय मुर्ती व सर्वत्र आनंदाचे, उत्साहाच्या वातावरणाचे. मात्र जोगेश्वरीतील जॉय ऑफ गिविंग या सोशल ग्रुपने गणेशोत्सवासाठी गणरायाच्या चरणी अर्पण करु या 'एक वही एक पेन' असं गणेशभक्तांना आवाहन करत एक अनोखी योजना अंमलात आणली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व विधायक कार्य साकारण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्याचा या व्हॉट्सअॅप ग्रुपचा मानस आहे. मुंबई व उपनगरात हजारो गणेशोत्सव मंडळे असून घरगुती गणपतींची संख्यादेखील लाखोंच्या घरात आहे. या सर्वच ठिकाणी उत्सव काळात भक्तांची रीघ लागलेली असते. प्रत्येकजण आपापल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशाला साकडे घालत असतो व यथाशक्ती काहीतरी अर्पण करत असतो. त्यामुळे भाविक गणरायाच्या चरणी दानरूपाने पैसे आणि प्रसाद अर्पण करण्याबरोबरच किमान एक वही व पेन अर्पण करण्याचे आवाहन गेल्या दोन वर्षांपासून ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येते. त्याला गणपती मंडळांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी तर अनेक मंडळांनी वही व पेन सोबतच इतर शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदतदेखील जॉय ऑफ गिविंगच्या या उपक्रमास प्रतिसाद देत देऊ केली. 

जॉय ऑफ गिविंगच्या सभासदांनी या योजनेतून जमा झालेले साहित्य पालघर व जव्हार या आदिवासी भागातील आश्रमशाळांत शिकणाऱ्या गरीब गरजू मुलांमध्ये वाटप केले. आज खेड्यापाड्यातील अनेक भागांत शिक्षणाचे वारे अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. शैक्षणिक साहित्य उपलब्ध न होऊ शकल्याने आदिवासी व दुर्गम भागांतील अनेक होतकरू मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरी नागरिकांचा थोडा हातभार लागावा या उदात्त हेतूने जॉय ऑफ गिविंगच्यावतीने 'गणराया चरणी एक वही एक पेन' अर्पण करण्याची संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच मुंबई भागात गेल्या वर्षी राबविली होती. या ग्रुपच्या वतीने गतवर्षी मुंबईत गणेशोत्सव मंडळांना त्या आशयाचे बॅनर्सदेखील दिले गेले होते. 

गेल्या वर्षी नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाही हाच उपक्रम ग्रुपच्या वतीने राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे व इतर सभासद हे अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांशी संपर्क साधत असून जमा होणारे साहित्य ग्रामीण आदिवासी तसेच झोपडपट्टी भागातील मुलांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प ग्रुपच्या सदस्यांनी या वर्षीदेखील केलेला आहे. त्यामुळे अधिकाधिक मंडळांनी व नागरिकांनी या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.  

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सवमुंबई