Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार एकनाथ शिंदेंना मिळाले 77 टक्के गुण; मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 19:22 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांवर योग्या बातमीदारी करण्याचा सल्ला दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांवर योग्या बातमीदारी करण्याचा सल्ला दिला. मी आजही पाहत होतो, काही जण उगाचच बोलत होते, असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी पत्रकारितेच्या पदविकेचे प्रमाणपत्र देखील घेतले आहे. यामुळे शिंदे आता डॉक्टरेटच नाही तर पत्रकारही झाले आहेत. 

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिंदे यांनी वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका (Journalism)  पदविकेचे प्रमाणपत्र घेतले आहे. या परीक्षेमध्ये ते ७७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी शिंदेंना हे प्रमाणपत्र दिले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार म्हणूनही ओळखले जाणार आहेत. 

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर ते नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याची चर्चा सुरू झाली होती.  त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. आता त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण देखील घेतले असून विशेष प्राविण्यासह 77.25 टक्के गुण मिळविले आहेत. त्यांनी हा अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण केला होता. 

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या यशाने विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत असल्याचे पाटील म्हणाले.  

टॅग्स :एकनाथ शिंदे