महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या बदलाच्या दिशेने पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार जोगेश्वरी येथील सध्याचे गुड्स यार्ड आता वसई आणि नायगाव दरम्यान स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे जोगेश्वरीत प्रस्तावित वंदे भारत मेंटेनन्स डेपो आणि नव्या जोगेश्वरी टर्मिनसच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. यासोबतच लांब पल्ल्याच्या सेवेत चांगला समन्वय साधता येणार आहे.
नवे गुड्स यार्ड वसई रोड-दिवा या विद्यमान कॉर्ड लाईन आणि नायगाव-जुचंद्रा या प्रस्तावित कॉर्ड लाईनच्या दरम्यान विकसित करण्यात येणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने निवडलेल्या या ठिकाणामुळे मालगाड्यांची वाहतूक मुख्य प्रवासी मार्गांपासून वेगळी ठेवता येणार असून, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.
लोडिंग-अनलोडिंग प्रक्रिया अधिक सुलभ
नायगावमध्ये प्रस्तावित असलेले हे गुड्स यार्ड सुमारे ८५० मीटर लांब आणि २७ मीटर रुंद असेल. यात प्रत्येकी ८०० मीटर लांबीच्या दोन गुड्स लाईन विकसित केल्या जाणार आहेत. दक्षिण दिशेला रॅम्पची सुविधा देण्यात येणार असून, त्यामुळे लोडिंग-अनलोडिंग प्रक्रिया अधिक सुलभ होईल. याशिवाय, व्यावसायिक व इतर विभागांसाठी चार मजली इमारत उभारण्यात येणार असून, प्रशासन व संचालनाशी संबंधित सर्व विभागांना एका संकुलात जागा मिळणार आहे.
मालवाहतूक, प्रवासी सेवांमध्ये राखता येणार समतोल
- जोगेश्वरी गुड्स यार्डमधून सध्या सिमेंट आणि ऑटोमोबाईल वाहतूक करण्यात येते. या माध्यमातून पश्चिम रेल्वेला सुमारे १०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. येत्या काळात नव्या टर्मिनसमध्ये ही स्थलांतरित करण्यात येणार असल्याने यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- येत्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर देखील सुरू होणार असल्याने यामध्ये वाढदेखील होऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे. एकूणच हा प्रकल्प मुंबई उपनगरीय परिसरात मालवाहतूक आणि प्रवासी सेवांमध्ये समतोल साधण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.