Join us  

JNU Attack: जेएनयुतील हल्ल्याचा नानाकडून निषेध, विद्यार्थ्यांना दिला मायेचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 10:57 AM

JNU Attack: नानाने जेएनयुमधील हल्ल्याचा निषेध नोंदवताना, देशातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रेमाचा सल्ला दिलाय

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी (दि.5) विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा देशातील पुडुच्चेरीपासून ते विदेशातील कोलंबिया, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध केला आहे. देशभरात या हल्ल्याचे तीव्र पडसाद जाणवले असून पुणे अन् मुंबईतही विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या. राजकीय पक्षांनीही या घटनेचा धिक्कार केला असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनीही या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला. अभिनेते नाना पाटेकर यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

नानाने जेएनयुमधील हल्ल्याचा निषेध नोंदवताना, देशातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रेमाचा सल्ला दिलाय. जेएनयुमधील विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अभिनेता नानाने केले आहे. तसेच, जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेधही नानाने नोंदवला. 'विद्यार्थी म्हणून आम्हीही होतो आणि तुम्हीही आहात. मुळात आपले आई-वडिल कोणत्या परिस्थितीतून आपल्याला शिकवतात हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. कारण, आम्हाला आता जर का कोणत्या राजकीय पक्षाने लोटलं तर आमचं विद्यार्थी म्हणून करिअर संपून जातं, हे राजकीय पक्ष सोडायला येत नाहीत. विद्यार्थ्यांना हे कळतं नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावे, असे नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनीही ट्विट केले असून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हल्लोखोरांवर कारवाई करावी करावी, असे म्हटले आहे. अनुपम खेर यांचे ट्विट सोशल मीडिवर व्हायरल होत आहे.

दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी संध्याकाळी माक्सधारी तरुणांनी हिंसाचार घडवला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंदू रक्षा दलानं या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र कुमार तोमर उर्फ पिंकी चौधरींनी सोमवारी रात्री याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

टॅग्स :जेएनयूनाना पाटेकरदिल्लीअनुपम खेरविद्यार्थी