Join us  

स्वत:वरचा ताबा सुटलाय का?; मंत्री जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ट्विटरवर शाब्दिक 'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 2:41 PM

त्याचसोबत कदाचित सत्ता गमावल्यानंतर असं होऊ शकतं नाहीतर तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? असा प्रश्न जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला

मुंबई - दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटत असताना मुंबईतही या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. गेट ऑफ इंडिया येथे आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी एका महिला आंदोलकाच्या हातात 'फ्रि काश्मीर' आशयाच्या बोर्डाने नवा वादाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्याला मंत्री जयंत पाटील यांनीही टोला लगावला आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एएनआयचा व्हिडीओ त्यांनी रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता. आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? हे फक्त मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किमीवर घडतेय? उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला जातोय, तो खपवून घेणार का, असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

यावर मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना उत्तर देत काश्मीर मुक्त करा याचा अर्थ भेदभावापासून, नेटवर्कवरील आणि केंद्र सरकारच्या जाचातून मुक्त करा असा होतो. तुमच्यासारखे नेते शब्दांचे अनर्थ काढून तिरस्काराची भावना निर्माण करतात. तुमच्यासारखा जबाबदार नेते अशाप्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो यावर विश्वास बसत नाही असा चिमटा काढला. 

त्याचसोबत कदाचित सत्ता गमावल्यानंतर असं होऊ शकतं नाहीतर तुमचा स्वत:वरचा ताबा सुटला का? असा प्रश्न जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनीही जयंत पाटलांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, या फुटिरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. हे मतांचे राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर भेदभावापासून मुक्त आहे. तर पूर्वीपासूनच सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरात निर्बंध आहेत. आम्ही विरोधात असो वा सरकारमध्ये आमचं प्राधान्य सर्वात प्रथम राष्ट्राला राहिलं आहे असं फडणवीसांनी जयंत पाटलांना सांगितले. त्यामुळे दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचे पडसाद आणि मुंबईतील फ्रि काश्मीर या पोस्टरवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये ट्विटरवरुन शाब्दिक वॉर सुरु असल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :जयंत पाटीलदेवेंद्र फडणवीसजेएनयूट्विटर