Join us  

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं केतकीचं वय, पंकजा मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 6:46 PM

शरद पवार यांच्या बाबतीत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमांतून आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, अट्रॉसिटी प्रकरणात केतकीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, केतकीच्या वयाचा विचार करता, एक वॉर्निंग देऊन या विषयाला पूर्णविराम द्यावा, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं होतं. आता, गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. 

शरद पवार यांच्या बाबतीत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, केतकीच्या पोस्टवरुन राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली होती. केतकीच्या पोस्टचं समर्थन न करता, केतकीला ज्याप्रकारे ट्रोल करण्यात आले त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या ट्रोलर्संवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर, पंकजा मुंडे यांनीही केतकीचं वय पाहता, तिला वॉर्निंग देऊन ही गोष्ट संपवली पाहिजे, असे म्हटले. अर्थात, केतकीची पोस्ट बिभत्सपणाची असल्याचेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. 

जितेंद्र आव्हाड यांनी कुणाचेही नाव न घेता फेसबुकवरुन निशाणा साधला. आव्हाड यांनी केतकीचं वय सांगत ती लहान नसल्याचं सूचवलं आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना शिव्या द्यायच्या आणि काही लोकांनी उठायचं आणि म्हणायचं निरागस आहे सोडून द्या. ह्याला काय म्हणायचे?, असा सवाल करत आव्हाड यांनी भलीमोठ पोस्ट केली आहे. 

केतकीचं वय 34 वर्षे - आव्हाड 

केतकी चितळे बद्दल थोडी वस्तुस्थिती समोर आणायचा प्रयत्न. केतकी चितळे हि 34 वर्षांची आहे 29 वर्षांची नाही. ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी हीच्याकडे तपास पूर्ण झाल्यावर स्वतःहून पोलिसांनी तिची पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली आहे. त्यानंतर त्या प्रकरणात ईतर ठिकाणी जरी गुन्हे नोंद असले तरी तिचा राज्यातील अन्य कोणत्याही पोलिसांनी तिचा ताबा मागितला नाही अथवा तिला "त्या आक्षेपार्ह पोस्ट" फेसबुकवर अपलोड केल्याबद्दल अटक केली नाही आहे.

म्हणून केतकीला अटक

2020 मध्ये अगोदरच केतकी चितळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत अश्लील अश्लाघ्य आणि निषेधार्य पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यावेळी म्हणजे 2020 मध्ये केतकी जरी 32 वर्षांची असली तरी नासमज आहे असे समजून पोलिसांनी कदाचित अटक केली नसेल. परंतु आवश्यक तपासानंतर तिच्याविरुद्ध पुरावा मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल कारण्याची परवानगी रबाळे पोलिसांनी मागितली आहे. आता आज केतकीला 2020 मध्ये तिने वरीलप्रमाणे इतिहासातील महामानवांबद्दल आणि दलित समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अश्लील आणि बेताल लिखाण केल्याबद्दल अटक केली आहे. कारण, आमच्या माहितीनुसार केतकीने या सर्व पोस्ट मीच फेसबुक वर share केल्या असून त्याबद्दल मी ठाम असून त्या डिलीट करणार नसल्याचे पोलिसांना काय न्यायालयात पण स्पष्ट सांगितले आहे.

म्हणून केतकीला अटक

2020 मध्ये या 32 वर्षाच्या निरागस अभिनेत्रीला पुरेशी समज देऊन देखील जर तिच्या दुष्कृत्याबद्दल तिला यत्किंचित पण चूक वाटत नसेल तर याच भारताला राज्यघटना देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समाजाला स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महात्मा फुले या महामानवांच्या प्रतिमेस जाणीवपूर्वक लांछन लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आज 34 वर्षाच्या या निरागस बालिकेला पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा करण्याचे बळ नक्कीच मिळाले नसते. कायदा किंवा पोलीस एक दोन वेळ संधी नक्कीच देतात हो. पण आपण त्या संधी साठी लायक नसेल आणि पोलीस किंवा कायद्याने समजूतदारपणाच्या घेतलेल्या भूमिकेला माझे काय वाकडे केले पोलिसांनी असा समज करून पुन्हा जाणीवपूर्वक त्या चुका नव्हे गुन्हा करण्याचा चंग कोणी बांधला असेल तर पोलीस तरी काय करणार तुम्ही विचार करा. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडकेतकी चितळेपंकजा मुंडे