Join us

"...म्हणून मी आज दगड आणला होता"; विधानभवनाच्या गेटवरच संतापले जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:55 IST

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात दगड घेऊन विधानभवानत पोहोचले होते.

Jitendra Awhad :बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पुरावे समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांना झालेली मारहाण आणि हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या सगळ्या प्रकाराचा वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हे दगड घेऊन आले होते. हा दगड म्हणजे सरकारचे हृदय असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्येआधी झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो सोमवारी संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे या फोटोंमधून समोर आलं आहे. त्यानंतर विरोधी पक्षानेही याप्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे हातात दगड घेऊन आले होते. दगडाला पाझर फुटेल पण युती सरकारला पाझर फुटणार नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

"हा दगड नाही तर हे महायुती सरकारचे हृदय आहे. पाषाणाला पाझर फुटू शकतो पण युती सरकारला पाझर फुटत नाहीये. ८० दिवसांपासून आम्ही ओरडून सांगत होतो की हत्या निर्घृणपणे केलीय. या क्रौर्याला सीमाच नाही असं आम्ही त्यांना सांगत होतो," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांना गेटवरच रोखलं आणि दगड आतमध्ये नेण्यास मनाई केली. त्यानंतर दगडाला पाझर फुटू शकतो पण या सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही म्हणत आव्हाड यांनी तो दगड बाहेर ठेवला.

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2025जितेंद्र आव्हाडसंतोष देशमुख हत्या प्रकरणबीड