Join us

घाटकोपरमध्ये ५ मार्चपासून ‘जिगरबाज खेळ महासंग्राम’ स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 15:18 IST

मनसे नेते गणेश चुक्कल आयोजित स्पर्धेच्या पोस्टर आणि थीम साँगचे दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते उद्घाटन.

मुंबई/घाटकोपर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाटकोपर पश्चिम विभागाचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या संकल्पनेतून ५ मार्च २०२४ पासून घाटकोपर येथील दत्ताजी साळवी मैदानात ‘जिगरबाज खेळ महासंग्राम’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ४४ पारंपारीक वैयक्तिक आणि सांघिक खेळांचा समावेश आहे. 

स्पर्धेच्या पोस्टर आणि थीम साँगचे उद्घाटन माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते झाले. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी चुक्कल यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या पुढाकारामुळे घाटकोपरमध्ये प्रथमच जिगरबाज खेळ महासंग्राम’सारखी महाक्रीडा स्पर्धा होत आहे. तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयाच्या आहारी जात चाललेल्या तरुणाईला पुन्हा मैदानांकडे वळवण्यासाठी, महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले पारंपारिक मैदानी खेळ मागे पडू नयेत. तसेच नव्या पिढीला या खेळांची ओळख होण्यादृष्टीने जिगरबाज खेळ महासंग्रामचे आयोजन केले जात असल्याचे चुक्कल यांनी यावेळी सांगितले.

खेळ संस्कृती जपणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्राची उत्तमोत्तम क्रीडापटू घडवण्याची परंपरा अबाधित ठेवतानाच घाटकोपरमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावेत, असे आम्हाला वाटते. शाळकरी मुलांना ऑलिम्पिक खेळांची माहिती व्हावी. त्यात सहभागी होण्यासाठी तयारीची संधी मिळावी या उद्देशाने क्रीडा स्पर्धा भरवत आहोत, असे चुक्कल पुढे म्हणाले. 

या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना उत्सवाचा आनंद, ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन आणि महिलांसाठी रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून इतरांसोबत पारंपारिक खेळ, गाणी, गप्पा याचा आंनद घेता यावा व महिलांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविता यावे हाही उद्देश असल्याचे चुक्कल यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईघाटकोपरमनसे