Join us

अंगडियावर गोळीबार करून ४७ लाखांचे दागिने लुटले; पोलिसांनी दोन आरोपींना केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:27 IST

पोलिसांनी ८ तासात कसा लावला छडा, वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरून निघालेल्या अंगडियावर सोमवारी रात्री गोळीबार करून एका टोळीने ४७ लाखांचे दागिने लंपास केले होते. मात्र एमआरए मार्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या सशस्त्र टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून साडेसोळा लाखांचे दागिने जप्त  केले आहे.

काळबादेवीतील रामवाडी परिसरात राहणारे अंगाडिया व्यावसायिक चिराग धंदुकिया (३६) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांचा विमल एअर सर्व्हिस नावाचा कुरिअर व्यवसाय आहे. धंदुकिया सोमवारी रात्री ४७ लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन कोकण रेल्वेने गोव्याला जाणार होते. ते काळबादेवी येथील कार्यालयातून रात्री दहाच्या सुमारास निघाले.

नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते १६ वर्षीय पुतण्यासोबत दुचाकीने ४७ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोने घेऊन जात होते. पी.डीमेलो रोडवरून जात असताना चौघा गुन्हेगारांनी त्यांची दुचाकी अडविली. दागिन्यांची बॅग दुचाकीवर मागे बसलेल्या चिराग यांच्या पुतण्याकडे होती. ती हिसकावण्याच्या प्रयत्न आरोपींनी केला. प्रतिकार करताच आरोपींपैकी एकाने पुतण्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि त्याच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि धंदुकियांच्या जखमी पुतण्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात नेण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी तीन ते चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

असा काढला आरोपींचा माग

  • पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे यांनी तातडीने पोलिस पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. 
  • सीसीटीव्हीच्या मदतीने टोळीतील दोन आरोपींची ओळख पटवून त्यांना काळबादेवी परिसरातून पहाटे जेरबंद केले.
  • किरण धनावडे आणि अरुण मढिया ऊर्फ घाची अशी त्यांची नावे आहेत. ते सराईत गुन्हेगार आहेत. 
  • या दोघांनी अन्य साथीदारांसह काळबादेवीतून चिराग यांचा पाठलाग सुरू केल्याचे समोर आले. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई