Join us

जपानने महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक वाढवावी: मुख्यमंत्री शिंदे, कॉन्सुलेट जनरलनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 06:02 IST

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र हे उद्योगस्नेही, गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगले काम करत आहेत. यापुढेही जपानने उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, जपानी शिष्टमंडळातील प्रतिनिधी शिमाडा मेगूमी उपस्थित होते. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी कोजी यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जपानी कंपन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विशेष इंडस्ट्रीयल पार्क विकसित करण्यात येणार असून, भविष्यातदेखील राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेजपान