Join us  

जैन समाजाचे दीडशे कोटींहून अधिक योगदान; अन्नधान्य, फूड पॅकेट्स उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 3:00 AM

मंदिर ट्रस्ट, व्यावसायिक प्रतिष्ठान, समाजातील दानशूर व्यक्तींनी अकरा हजार रुपयांपासून एक कोटी रुपयेपर्यंतचे योगदान दिले असून, ३० मार्चपर्यंत हे योगदान दीडशे कोटींच्या पुढे गेले आहे.

मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या राष्ट्रीय लढाईमध्ये भारतातील जैन समाजाने पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये दीडशे कोटी रुपयांहून अधिक योगदान केले असल्याची माहिती अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

‘जितो’चे चेअरमन गणपत चौधरी, अध्यक्ष प्रदीप राठोड, ‘जेएटीएफ’चे चेअरमन पृथ्वीराज कोठारी, माजी खासदार विजय दर्डा, शांतीलाल कवाड, बीजेपीचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली जैन समाजातर्फे संपूर्ण भारतामध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये विविध प्रकारची मदत मोठ्या प्रमाणावर पुरवली जात आहे.

गौतम अदानी यांनी १०० कोटी रुपये, मोतीलाल ओसवाल यांनी सहा कोटी रुपये, सेलो ग्रुपचे प्रदीप राठोड यांनी पाच कोटी रुपये, मायक्रो लॅबचे दिलीप व आनंद सुराणा यांनी पाच कोटी रुपये, इंडिया इन्फोलाईनचे निर्मल जैन यांनी पाच कोटी रुपये, या प्रमुख मान्यवरांसह विविध मंदिर ट्रस्ट, व्यावसायिक प्रतिष्ठान, समाजातील दानशूर व्यक्तींनी अकरा हजार रुपयांपासून एक कोटी रुपयेपर्यंतचे योगदान दिले असून, ३० मार्चपर्यंत हे योगदान दीडशे कोटींच्या पुढे गेले आहे.

पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधील योगदानाबरोबरच जितोतर्फे एक लाख अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट्स,राष्ट्रीय अल्पसंख्याक महासंघातर्फे साडेसहाशे शाखांच्या माध्यमातून अन्नधान्य पॅकेट्स, बीजेएसतर्फे रक्तदान शिबिर, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांत फूड पॅकेट, वैद्यकीय साहाय्यता उपलब्ध करून देण्यात येत आहे.

देशभरातील लाखो कार्यकर्ते सहभागी

जैन समाजाच्या विविध संस्थांचे देशभरातील लाखो कार्यकर्ते या सेवा कार्यात झोकून देऊन काम करत आहेत. या विविध प्रकारच्या मदतीबरोबरच विविध राज्यांतील जैन समाजाच्या धर्मशाळा, हॉस्टेल, आदी सुविधा सरकारला कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या असून, या ठिकाणी रुग्णांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. या राष्ट्रीय लढाईमध्येसुद्धा समाज मदतकार्यात अग्रभागी राहात असून यापुढील काळातही समाजातील दानशूर व्यक्तींनी अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही ललित गांधी यांनी केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र