Join us
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये साकारणार आर्ट गॅलरी ; आ. राहुल नार्वेकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 05:15 IST

कलाकारांकडून घेणार नाममात्र शुल्क

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुलाबा हे आर्ट गॅलरीचे प्रमुख केंद्र आहे. कुलाबा ‘आर्ट डिस्ट्रिक्ट’च आहे. परंतु, येथील आर्ट गॅलरींमध्ये कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी पाच -सहा  वर्षे वाट पाहावी लागते. हे लक्षात घेऊन राज्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय परिसरात  आर्ट गॅलरी साकारण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कुलाब्याचे भाजप आ. राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कुलाबा परिसरात जहांगीर, बजाज, पंडोल, आदी आर्ट गॅलरी आहेत.  मात्र, त्यांचे अवाढव्य भाडे अनेक कलाकारांना परवडत नाही. तसेच,  त्यांचे बुकिंग पाच-सहा वर्षे आधीच झालेले असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांना नाममात्र भाडे आकारून शासनाची आर्ट गॅलरी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.

काळा घोडा फेस्टिव्हलला मोठा प्रतिसाद मिळतो.  त्या परिसरात ब्रिटिशकालीन इमारती असल्यामुळे एक वेगळाच लूक या परिसराला आहे. त्यामुळे येथे आकर्षक रस्ते, सौंदर्यीकरण करून टुरिझम झोन तयार करण्यात येणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.

जीटी कार्यालये हलविणार

२०२४ मध्ये जीटी आणि कामा या दोन रुग्णालयांचे संलग्नीकरण करून नवीन महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र, महाविद्यालयासाठी जागा कमी पडत असल्यामुळे जीटी रुग्णालय परिसरातील १२ मजली इमारत पुढील तीन महिन्यांत रिकामी करण्यात येणार आहे. त्या इमारतीच्या पहिल्या सहा माळ्यांवर बॉम्बे हायकोर्टाची, तर इतर मजल्यांवर प्रशासकीय कार्यालये आहेत.

ही सर्व कार्यालये एअर इंडिया इमारतीमध्ये स्थलांतरित करून ती जागा महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी उपयोगात आणली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात जागा मिळेल, असेही नार्वेकर यांनी सांगितले.

नव्या मेडिकल कॉलेजात पीजी सुरू करणार

नव्या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा आहेत. पुढच्या वर्षी त्या १०० करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच वैद्यकीयचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असेही नार्वेकर म्हणाले.

टॅग्स :राहुल नार्वेकर