माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:43 IST2025-11-08T08:42:19+5:302025-11-08T08:43:25+5:30
मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ

माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माझे नाव आणखी कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडले आहे का? माझे नाव चारकोप विधानसभा मतदारसंघातील दोन मतदार याद्यांमध्ये असणे, ही निवडणूक आयोगाची चूक आहे. याची सर्वस्वी जबाबदारी आयोगाची आहे, अशी ठाम भूमिका काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी शुक्रवारी मांडली.
मालाड येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगावर टीका करताना शेख म्हणाले की, जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने दुबार मतदार शोधणे सहज शक्य आहे. मात्र असे असतानादेखील मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे.
विधानसभा पराभवाने विराेधकांचा जळफळाट
मालाड विधानसभेत १७ हजार मुस्लीम दुबार मतदार असल्याचा शेलार यांच्या आरोपाला उत्तर देताना शेख म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सत्ताधाऱ्यांचा जळफळाट होत आहे. जर मालाड पश्चिममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असतील तर ते शोधून काढणे, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.