Join us

‘लिंबासाठी मध्यरात्री महिलेच्या घराचे दार ठोठावणे अशोभनीय’: मुंबई उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:19 IST

उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी ठोठावण्यात आलेला दंड रद्द करण्यास नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विचित्र वेळेस महिलेच्या घरचे दार ठोठावून तिच्याकडे लिंबू मागणे, हे कृत्य सीआयएसएफ कर्मचाऱ्यासाठी  अशोभनीय व निंदनीय आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी ठोठावण्यात आलेला दंड रद्द करण्यास नकार दिला.

सेंट्रल इंडस्ट्रीय सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) चा हवालदाराने १९ मार्च २०२१ रोजी रात्री मद्यपान केले होते. शेजारच्या महिलेचा पती पश्चिम बंगालला निवडणुकीच्या कामासाठी गेला होता, याबाबत अर्जदाराला माहिती होती, असे निरीक्षण न्या. नितीन जमादार व न्या. एम.साठये यांच्या खंडपीठाने नोंदविले. याचिकादार अरविंद कुमार (३३) याची घटनेच्या वेळी बीपीसीएलमध्ये पोस्टिंग होती.  त्याने वरिष्ठांनी  ठोठावलेल्या दंडाला उच्च न्यायालयात आव्हान  दिले होते.  सीआयएसएफने तीन वर्षे अरविंदच्या वेतनात कपात केली आणि त्याला बढतीही दिली नाही, या शिक्षेला अरविंद याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. 

१९ व २० मार्च २०२१ च्या मध्यरात्री अरविंदने दारूच्या नशेत शेजारच्या महिलेच्या घराचे दार ठोठावले. संबंधित महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह घरात होती. महिलेने अरविंदला धमकावल्यावर व तंबी दिल्यावर तो तिथून निघून गेला. अरविंदने आपला बचाव करताना न्यायालयाला सांगितले की, तब्येत ठीक नव्हती म्हणून शेजारच्या घरी लिंबू मागायला गेलो होतो.  ‘घरातील पुरुष गैरहजर असून केवळ एक महिला आणि सहा वर्षांची मुलगी आहे, हे माहिती असूनसुद्धा तब्येत ठीक नाही म्हणून लिंबू हवे आहे, असे कारण देऊन महिलेच्या घरचा दरवाजा ठोठावणे, हे कृत्य अशोभनीय व निंदनीय आहे,’ असे खंडपीठाने अरविंदची याचिका फेटाळताना म्हटले.

 

टॅग्स :मुंबई हायकोर्ट