इस्रो भविष्यात इतरांसाठीही अंतराळ मोहिमेची दारे उघडणार; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:39 IST2025-12-25T10:38:51+5:302025-12-25T10:39:36+5:30
‘गगनयान’ मोहिमेसाठी निवड झालेले अंतराळवीर अंगद प्रताप, प्रशांत नायर उपस्थित होते. आगामी काळात अपोलोप्रमाणे मोहिमा, स्पेस स्टेशनसारख्या मोहिमा आणि चंद्रावर उतरण्यासारख्या मोहिमा राबविल्या जाणार आहेत. त्यामध्ये अधिक लोकांची गरज असेल.

इस्रो भविष्यात इतरांसाठीही अंतराळ मोहिमेची दारे उघडणार; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या अंतराळ मोहीम ही वैमानिकांपुरती मर्यादित असली तरी, भविष्यात इस्रो अभियांत्रिकी समुदायातील लोक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अंतराळाची दारे उघडणार आहे, असे प्रतिपादन भारताच्या गगनयान मिशनमधील अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आयआयटी मुंबईतील टेकफेस्टमध्ये आयोजित अंतराळ परिषदेत केले.
यावेळी ‘गगनयान’ मोहिमेसाठी निवड झालेले अंतराळवीर अंगद प्रताप, प्रशांत नायर उपस्थित होते. आगामी काळात अपोलोप्रमाणे मोहिमा, स्पेस स्टेशनसारख्या मोहिमा आणि चंद्रावर उतरण्यासारख्या मोहिमा राबविल्या जाणार आहेत. त्यामध्ये अधिक लोकांची गरज असेल. भारताने एकदा एक-दोन वेळा मानवाला यशस्वीरीत्या अंतराळात नेले की त्यानंतर ही संधी इतर क्षेत्रांसाठीही खुली होईल. यात वैद्यकीय व्यावसायिक, संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि अन्य कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती येऊन अंतराळवीर होण्याचा दावा करू शकतील, असेही शुक्ला यांनी सांगितले.
तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वोत्तम असाल, तर अंतराळवीर होण्याची संधी नक्कीच असेल, असे अंगद प्रताप यांनी सांगितले.
अंतराळातून भारत कसा दिसतो ?
हा एक ऐतिहासिक प्रश्न असून, १९८४ मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांना विचारण्यात आला होता. त्यांनी अंतराळातून भारताचे वर्णन करताना ‘सारे जहाँ से अच्छा’ म्हटले होते. त्यांच्या उत्तरापेक्षा चांगले उत्तर मी देऊ शकत नाही. मी अंतराळात प्रवास करणारा दुसरा भारतीय असलो, तरी या काळात भारत खूप बदलला आहे. आजचा भारत वरून पाहिल्यावर अभिमान वाटावा असा दिसतो. तो आत्मविश्वासाने भरलेला आहे, तो धाडसी आणि साहसी दिसतो. या सर्व कारणांमुळेच आजही ‘भारत सारे जहाँ से अच्छा’ आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले.
रशियात खडतर प्रशिक्षण
रशियाचा हिवाळा फारच कडाक्याचा असतो. नेपोलियन आणि हिटलर यांचा पराभवही रशियन हिवाळ्यामुळे झाला, असे म्हटले जाते. तिथल्या हिवाळ्यात तग धरण्याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. त्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणजे सर्व्हायव्हल ट्रेनिंग हे होते. कारण अंतराळयान पृथ्वीवर परतताना थोडीशी चूक झाली, तरी सुमारे ५०० किलोमीटरने लक्ष्यापासून दूर जाऊ शकते. तुम्हाला अशा परिस्थितीत दोन दिवस स्वतःच्या जोरावर तग धरावा लागतो, असा अनुभव अंतराळवीर प्रशांत नायर यांनी सांगितला.