मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 07:35 IST2025-07-06T07:34:19+5:302025-07-06T07:35:23+5:30
२०१७ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने ८४ जागा तर मनसेने ७ जागा जिंकल्या होत्या; मात्र उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अर्धी ताकद कमी झाली आहे.

मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
महेश पवार
मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रित सामोरे गेल्यास उद्धवसेनेच्या ताब्यात असणारी महापालिका आपल्याकडे खेचण्याचे लक्ष्य भाजपला सहज साध्य होणार नाही.
२०१७ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेने ८४ जागा तर मनसेने ७ जागा जिंकल्या होत्या; मात्र उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांची अर्धी ताकद कमी झाली आहे. त्यातच मनसेने स्वतंत्र निवडणूक लढल्यास मराठी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपपेक्षा शिंदेसेनेला जास्त होण्याची शक्यता होती; मात्र मनसे सोबत आल्यास उद्धव ठाकरे यांची ताकद वाढेल. याशिवाय दोघांनाही आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवता येईल.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी १० जागा निवडून आणल्या. मुंबईतील गिरणी कामगारांचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझगाव, भायखळा, परेल, शिवडी, दादर भागात उद्धव ठाकरेंचे वर्चस्व आहे. तेथील उद्धवसेनेची फळी शिंदेसेनेला फोडता आलेली नाही. दुसरीकडे भांडुप, मुलुंड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी यांसारख्या पूर्व -पश्चिम उपनगरात मनसेची बांधणी मजबूत आहे. दोघे एकत्र आल्यास एकमेकांची मते ट्रान्सफर होऊन विजयाची शक्यता अधिक वाढणार आहे.
मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंचा करिष्मा आहेच; परंतु आता ठाकरे घराण्यातील अमित आणि आदित्य ही चौथी पिढी एकत्र आल्यास महायुतीसमोर आव्हान उभे राहू शकते. जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. महायुतीमध्ये मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिंदेसेना लहान भाऊ असेल. तर महाविकास आघाडीत उद्धवसेना हाच मोठा पक्ष असेल हे निश्चित आहे; पण राजसोबत आल्यास जागा वाटपावर चित्र स्पष्ट होईल.
दोघे एकत्र येण्याचे फायदे तसे तोटे आहेत. परस्परविरोधी भूमिकेमुळे मराठी, मुस्लीम मतांचे विभाजन होऊ न देता ती एकत्र कशी ठेवायची यासाठी व्यवस्थित अजेंडा तयार करावा लागणार आहे. विधानसभेत मुस्लिमांची मते उद्धवसेनेला मिळाली; परंतु भोंग्याचा मुद्दा मनसेने हाती घेतल्यामुळे हा समाज नाराज आहे. मुंबईत ३३ टक्के मराठी मते आहेत. ती विखुरलेली आहे. तर, हिंदी, गुजराती मते भाजपच्या बाजूने आहेत. सत्तेचा फायदा शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळत आहे. त्यामुळे उद्धवसेनेमध्ये खदखद असली तरी राज सोबत आल्यास तो उद्धवसेनेसाठी बूस्टर डोस ठरणार आहे.