कबुतरखान्यांवर बंदीसाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:57 IST2025-07-14T09:57:05+5:302025-07-14T09:57:23+5:30
शासनानेही यांची गंभीर दखल घेत कबुतरखाने बंद करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्याचे आश्वासन विधान परिषदेत दिले.

कबुतरखान्यांवर बंदीसाठी राजकीय इच्छाशक्ती आहे का?
- सुजित महामुलकर, विशेष प्रतिनिधी
बुतर हे शांतता, निष्ठा, प्रेमाचे प्रतीक मानले जात असले तरी काही मान्यता, अंधश्रद्धा बाजूला ठेवून मानवासाठी रोगवाहक असलेल्या या पक्षावर किती भूतदया दाखवावी, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मुंबईतील कबुतरखाने ऐतिहासिकच नाही तर मुंबईची ओळख मानली जाते. हे जरी खरे असले तरी कबुतरांपासून मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे हे सत्य नाकारून घातक असलेल्या बुतरखान्यांना आपण कुठपर्यंत संरक्षण देणार? कारण एक-दोन-पाच नव्हे, तर मुंबईत ५१ कबुतरखाने आहेत. त्यात प्रामुख्याने दादर, माटुंगा, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, फोर्ट हे प्रसिद्ध असून, त्यांची ‘लँड-मार्क’ म्हणूनही एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
कबुतरखान्यांजवळच्या रहिवासी भागात श्वसन विकारांचे रुग्ण आढळत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे स्थानिकांचा विरोध आता तीव्र झाला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी चालू विधिमंडळ अधिवेशनात या विषयाकडे लक्ष वेधले. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे आपण आपली मावशी गमावल्याचे त्यांनी सांगितले.
शासनानेही यांची गंभीर दखल घेत कबुतरखाने बंद करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्याचे आश्वासन विधान परिषदेत दिले. दादर कबुतरखाना यापूर्वी बंद झाला होता, पण काहींनी कबुतरांना दाणे टाकायला सुरुवात केली आणि कबुतरांनीच ही बंदी मोडीत काढली.
कबुतरखाने का हटत नाहीत? या प्रश्नाला काही प्रमाणात धार्मिक किनारही आहे. तसेच ‘व्यापार बरकत’सारख्या काही अंधश्रद्धा, भूतदया अशीही कारणे आहेत.
दुसरा मुद्दा असा की, कबुतरखाने पालिकेच्या कुठल्याही ठरावीक विभागाच्या अखत्यारित येत नाहीत. अस्वच्छतेच्या बाबतीत घनकचरा व्यवस्थापन विभाग कारवाई करतो, तर श्वसनाचे आजार आरोग्य खात्याकडे. त्यामुळे निर्णय प्रत्येक विभागवार होतात. ‘ए’ विभाग सोडला तर अन्य विभाग कार्यालयांत उपद्रव शोध पथकाची नेमणूकच झालेली नाही.
तिसरा मुद्दा, कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घालण्यासाठी पालिकेकडे उपद्रव शोध पथके नाहीत. ती नेमली तरी त्यांची पाठ फिरताच कबुतरप्रेमी दुकानातून दाणे खरेदी करून टाकतील आणि दाणे विकण्यावरबंदी आणली जाऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न समूळ नष्ट करण्यासाठी उच्च स्तरावर धोरणात्मक निर्णयाची गरज आहे आणि निर्णय घ्यायचा तर राजकीय इच्छाशक्ती हवी. अन्यथा अनधिकृत झोपड्या आणि फेरीवाल्यांवर तोंडदेखली कारवाई होते, तसेच स्वरूप याही कारवाईला येऊ शकते.
काय काळजी घ्याल?
कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी, जिवाणू धोकादायक ठरू शकतात. कबुतरांपासून दूर राहा
त्यांना खायला घालू नये, ती स्वत:चे अन्न स्वत:च शोधतात
कबुतरखान्याच्या परिसरात असाल तर मास्क किंवा रुमालाचा वापर करा. श्वसनविकाराच्या रुग्णांनी कबुतरांचा वावर असलेल्या ठिकाणी अधिक काळजी घ्यावी. अनेक दिवसांपासून खोकला येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
कबुतरे उडतात तेव्हा त्यांच्या पिसांमधून आणि वाळलेल्या विष्ठेमधून बाहेर पडलेले सूक्ष्म कण फुप्फुसात गेल्याने श्वसनविकार उद्भवतात. काही रुग्णांची फुप्फुसे निकामीही झाली आहेत. या रुग्णांना ‘लंग्स फायब्रोसिस’सारखा गंभीर आजार झाला आहे. काही रुग्णांना कृत्रिमरीत्या ऑक्सिजन द्यावा लागतो.
डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय