विकास करायचाच नाही का?: संजय दिना पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:35 AM2024-04-15T07:35:06+5:302024-04-15T07:35:27+5:30

संजय दिना पाटील म्हणाले की, जिंकणे-हरणे आमच्या हातात नाही, पण गेल्या दहा वर्षांत या भागात काय विकास झाला, हे मतदारांनी पाहिले आहे.

Is there no need for development says Sanjay Dina Patil | विकास करायचाच नाही का?: संजय दिना पाटील 

विकास करायचाच नाही का?: संजय दिना पाटील 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील नागरिक डम्पिंग ग्राउंडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. मुंबईचा कचरा आमच्याकडे आणला जातो. दुसरीकडे पीएपी प्रकल्पाची भर पडत आहे. आम्हाला विकास हवा आहे, पण सगळा भार आमच्यावरच का? आम्ही फक्त समस्यांतच राहायचे का? या भागाचा विकास करायचाच नाही का? असे सवाल मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उपस्थित केले. लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते.
 
संजय दिना पाटील म्हणाले की, जिंकणे-हरणे आमच्या हातात नाही, पण गेल्या दहा वर्षांत या भागात काय विकास झाला, हे मतदारांनी पाहिले आहे. आजही काही भागांत नाकाला रुमाल लावल्याशिवाय जाता येत नाही. मुलुंडचे डम्पिंग ग्राउंड हटविण्याचे नाटक करत, फक्त काही अंतरावर म्हणजे कांजूरमार्गमध्ये आणून ठेवले. दुसरीकडे देवनारचे डम्पिंग ग्राउंड आहे. या मतदार संघाला कचऱ्यानेच वेढले आहे. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही. हे पूर्णतः हटविण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे पीएपी प्रकल्प, धारावी पुनर्वसनाबाबतही शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. फक्त मतांसाठी खोटे आश्वासन न देता, त्यासाठी प्रयत्न करण्याची आम्हाला शिकवण आहे. या मुद्द्यांसह चांगली आरोग्य व्यवस्था, तसेच कोकणी बांधवांसाठी हक्काचा रेल्वे थांबा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावी, यासाठी प्रयत्नशील राहू. 

कुठलीही निवडणूक सोपी नसते. मात्र, यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास, एकनिष्ठ शिवसैनिकांची साथ, शरद पवार गटाचे कार्यकर्ते व आई-वडिलांच्या पुण्याईतून मिळालेला सामजिक वारसा पाठीशी आहे. वडिलांना मानणारा एक मोठा वर्ग या मतदार संघात आहे. मुलुंड ते मानखुर्द परिसरात प्रेम देणारे मतदार आहेत. त्यांच्या विश्वासावर पुन्हा एकदा मैदानात उतरलो आहे. दुसरीकडे, जास्तीतजास्त मतदारांनी मतदानासाठी उतरावे, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मतदार राजावर विश्वास आहे. यावेळी मतदानाचे कर्तव्य बजावून सुट्टीला जाण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्येकाचे मत मौल्यवान आहे. प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.

Web Title: Is there no need for development says Sanjay Dina Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई