MNS Chief Raj Thackeray And Amit Thackeray News: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळाचा नारा देत मोठ्या अपेक्षेने मतदारांना सामोरे गेले. परंतु, मनसेची प्रचंड निराशा झाली. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यावरून राजकीय वर्तुळात मात्र मोठीच चर्चा रंगली. यातच विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विधानसभा निवडणुकीचे निकाल विरोधात गेल्यानंतर आता झाले गेले विसरून मनसे महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीबाबत रणनीती आखली जात आहे. अनेक गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये होऊ नये, यासाठी मनसे कंबर कसून तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकल्याचे कबूल केले
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात आपल्या उमेदवारांना मते मिळाली, पण ती गायब झाली, असे विधान केले होते. मतदान यंत्रातील घोळावर त्यांनी दोषारोप केला. मात्र, माहीम मतदारसंघातून पराभूत झालेले मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी माहीममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकल्याचे कबूल केले. मतदान यंत्रावर अपयशाचे खापर फोडणे म्हणजे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे निकालाबाबत ठाकरे पिता-पुत्रात मनभिन्नता आहे की, राज यांच्यातील नेत्यावर पित्याने मात करून पराभवाचे शल्य मनाला लावून न घेण्याकरिता पुत्राची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील नेत्यांच्या शिवतीर्थावरील फेऱ्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर काहीच दिवसांत शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत तसेच त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीसोबत जाणार का, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.