दिवाळीच्या आडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:12 IST2025-10-22T12:12:34+5:302025-10-22T12:12:34+5:30
विविध राजकीय पक्षांनी दिवाळीच्या आडून मुंबई महापालिका निवडणूक प्रचार सुरू केल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

दिवाळीच्या आडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग आणि प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले. याचाच भाग म्हणून विविध राजकीय पक्षांनी दिवाळीच्या आडून मुंबई महापालिका निवडणूक प्रचार सुरू केल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
काही नेत्यांनी तर कल्पना लढवत दिवाळी साहित्य वाटप, मोफत साखर वाटप अशा कार्यक्रमांसह कुठे खाद्य महोत्सव तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल केली आहे. याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना ते दिसत आहेत. अगदी काहीच नाही तर पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यापासून ते गल्लीतील इच्छुक उमेदवारापर्यंत सगळ्यांचे फोटो असलेले उटण्याचे पाकीट तरी अनेकांकडून घरोघरी वाटप करण्यात आले.
साखर वाटप करून तोंड गोड
दादरमध्येही उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांच्यातर्फे गेले पाच दिवस दादर पश्चिमेकडील गॅरेज गल्ली, खांडके बिल्डिंग, सर्वोदय भुवन, साईबाबा मंदिर (कुंभारवाडा), बुद्ध विहार (आंबेडकर नगर) अशा पाच ठिकाणी मोफत साखरवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शिंदेसेनेतर्फेही नुकतेच मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करत लाखांची बक्षिसे वाटली.
गप्पा मारल्या, नृत्यात सहभाग
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गोरेगाव येथील हबाले आदिवासी पाड्याला भेट देत आदिवासी भगिनींसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्याशी गप्पा मारल्या, पारंपरिक नृत्यात सहभागी झाल्या. उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी फुलबाजा लावला आणि जवळपास अर्धा दिवस त्यांच्यासोबत व्यतीत केला. आदिवासींना जेवण दिले आणि निघताना सर्व महिलांना प्रमुख नेत्यांचे छायाचित्र छापलेल्या एका बॉक्समध्ये भेटवस्तू दिली.
इच्छुकांचा मोठा सहभाग
मनसेचे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी भायखळ्यामध्ये तर चेंबूरला कर्णबाळ दुणबळे यांनी स्थानिकांना सुगंधी उटणे आणि पणत्या वाटप केले. मुंबई महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शुभेच्छा संदेशांचा पूर
दिवाळीनिमित्त गल्लोगल्ली होर्डिंग आणि बॅनर्स लागलेले आहेतच. याशिवाय समाजमाध्यमांवरही दिवाळीनिमित्त शुभेच्छांद्वारे प्रचार करण्याकडे मोठा कल दिसून येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर उमेदवारांच्या शुभेच्छा संदेशाचा पूर आल्याचा अनुभव मतदारांना येत आहे.