Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेस्ट’ खासगीकरणाच्या मार्गावर? कंत्राटदाराच्या जीवावर सेवा सुरू; धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:39 IST

Best Bus News: दररोज लाखो मुंबईकर ज्या बेस्टने प्रवास करतात, त्या बेस्टसाठी केवळ एक हजार कोटी रुपयांची तरतूद मुंबई मनपा बजेटमध्ये करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Best Bus News:बेस्ट उपक्रमाची बस सेवा ही मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेनंतर बेस्ट बस या मुंबईसाठी मोठ्या आधार ठरतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रम संकटात असल्याचे म्हटले जात आहे. यातच बेस्ट उपक्रमाच्या बससेवेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंत्राटदाराच्या जीवावर बससेवा सुरू असून, बेस्ट खासगीकरणाच्या उंबरठ्यावर आहे का, अशी चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. 

मुंबई महानगरपालिकेचे बजेट सादर झाले. दररोज लाखो मुंबईकर ज्या बेस्टने प्रवास करतात, त्या बेस्टसाठी केवळ एक हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. एकूण ८० हजार कोटींच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या वाट्याला दोन टक्केही तरतूद नाही. बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात पालिकेकडून एक हजार कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. उपक्रमाचा तोटा वाढत असताना, दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात असताना आणि कर्मचाऱ्यांना वेतन देणेही मुश्कील होऊ लागले असताना हे अनुदान बेस्टसाठी बूस्टर डोस ठरू शकते.

मुंबईतील परिवहन सेवा खासगी कंत्राटदारांच्या हातात आहे का?

मुंबईतील परिवहन सेवा खासगी कंत्राटदारांच्या हातात आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ २४९ बसेस आहेत. तर या उलट कंत्राटदारांकडील तब्बल २५०० बसच्या जीवावर बेस्टची सेवा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील बेस्ट सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेतील एका लेखी उत्तरातून पुढे आलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या मालकीच्या बस संख्येत झपाट्याने घट होत आहे. एप्रिल २०२४ मध्ये बेस्टच्या १०९८ बस सेवेत होत्या. हीच संख्या आता कमी होऊन एप्रिल २०२५ मध्ये ७५७ होती, तर सद्यस्थितीत मात्र बेस्टच्या स्वतःच्या केवळ २४९ बसेस सेवेत उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. 

बेस्टच्या ताफ्याचा विस्तार आणि मार्गांच्या योग्य नियोजनाची गरज

मुंबई महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बेस्टच्या ताफ्याचा विस्तार करावा, तसेच मार्गांचे योग्य प्रकारे नियोजन केले तर बेस्टची प्रवासी संख्या वाढू शकेल, असा महत्वाचा निष्कर्ष सात सदस्यीय समितीने अहवालात नोंदविला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. बेस्टच्या बस वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची शिफारस केली आहे. गेल्या काही वर्षांत बेस्ट बसची संख्या आणि प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे समितीने म्हटले आहे.

दरम्यान, पालिकेकडून येणारा हा निधी कसा वापरायचा, याचे नियोजन सर्वस्वी बेस्ट उपक्रमावर अवलंबून आहे. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच बेस्टला दिले होते. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकर मिळण्याची शक्यता आहे. यंदा जवळपास ४ वर्षांनी परिवहन समिती स्थापन झाली आहे. तिच्या अध्यक्षपदी शिंदेसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांची निवड झाली. या अनुदानाच्या रकमेचा विनियोग कसा केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BEST on Privatization Path? Reliance on Contractors Sparks Concern

Web Summary : Mumbai's BEST bus service faces privatization fears as reliance on contractor-owned buses increases. With a shrinking fleet and limited municipal funding, BEST struggles, raising concerns about its future and the quality of public transport.
टॅग्स :बेस्टमुंबई महानगरपालिका