Join us

ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 05:44 IST

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाचे नेतेही हजर होते. राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला आहे. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येत आहे.

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाचे नेतेही हजर होते. राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात असू शकते. दरम्यान, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथे काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची शक्यताही आहे.

एकनाथ शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’

ठाणे : मुंबई पालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत, हे सुज्ञ जनता ओळखून आहे, अशी टीका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. सत्तेत असूनही कॉमन मॅन सारखाच वागणारा नेता एकच, तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हीच सामान्यांची भावना आहे. आपल्या कामातून खऱ्या अर्थाने “मराठी माणसाचे हृदयसम्राट” बनले आहात, अशी भावना सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली.

शरद पवार गटाबरोबर आघाडी?

काही महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसची समविचारी पक्ष असलेल्या शरद पवार गटाबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करूनच घेतला जाणार आहे.

निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने लढवायच्या याची पक्षात चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ काँग्रेस नेते

त्यांची मविआबरोबर लढण्याची तयारी असेल तर लढायचे की नाही हे ठरवू. ठाकरे बंधूंचे काय ठरते त्यानंतरच आम्हाला आमची भूमिका ठरवता येईल.

विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षनेते, काँग्रेस

निष्पाप हिंदुंना भाषा विचारून चोपताहेत

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदुंना गोळ्या मारल्या गेल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदुंना भाषा विचारून चोपताहेत. इंग्रजांची रणनीती होती तोडा आणि राज्य करा, आता काही पक्षांची रणनीती आहे भीती पसरवा आणि स्वतःची मते मिळवा, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.

भाजपची टीका

सत्तेसाठी एकत्र आले.

पुन्हा मुंबईची लूटमार... त्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड.

उद्धव यांची हातमिळवणी म्हणजे.. निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब ‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न : शेलार

मनसेकडून प्रत्युत्तर

मनसेकडून मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, अशोक चव्हाण एकत्र बसलेला फोटो पोस्ट.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फोटोखाली लिहिले  की, ‘हे सत्तेसाठी आणि मग तुम्ही कशासाठी?’

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरे