Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमान आहे की एसटी? चक्क सीटच नाही; प्रवाशाला धक्का, 'इंडिगो'च्या एका विमानातला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 06:27 IST

एका महिला प्रवाशासोबत हा प्रकार घडल्यानंतर इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विमानात बसायला गेल्यानंतर सीटच जागेवर नसण्याच्या दोन घटनांमुळे चर्चेत आलेल्या इंडिगो कंपनीच्या ताफ्यातील आणखी एका विमानात असाच प्रकार घडला आहे. एका महिला प्रवाशासोबत हा प्रकार घडल्यानंतर इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे.

रया घोष असे या महिला प्रवाशाचे नाव असून, तिने ट्विटरद्वारे आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. मात्र, ती इंडिगोच्या कोणत्या विमाने कुठून कुठे जात होती याचे तपशील तिने दिलेले नाहीत. इंडिगोच्या विमानात प्रवेश केल्यानंतर जेव्हा आपल्या जागेवर बसण्यासाठी गेली तेव्हा तिथे सीटच नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब तिने केबिन क्रूच्या निदर्शनास आणून दिली. तीची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली. मात्र, तिने त्या जागेचा फोटो काढून तो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. ती ज्या विमानाने जाणार होती त्या विमानाला आधीच सुमारे दीड तास विलंब झाला होता. त्यात सीट जागेवर नसल्यामुळे तिने इंडिगो कंपनीला जवाब मागितला आहे.

इंडिगो कंपनीने या प्रकाराची दखल घेत तिची दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, तिने केलेल्या या पोस्टवर नेटिझन्सने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेव्हा विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळी विमानाची तपासणी केली जाते. तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही का, असा सवाल एका नेटिझनने उपस्थित केला आहे.

टॅग्स :इंडिगोविमान