Join us

ही फसवणुकीची पद्धत की वंशवादाची वृत्ती?, अश्विनी भिडे यांचे ब्रिटिश एअरवेजवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 08:53 IST

भिडे यांच्या तक्रारीनंतर ब्रिटिश एअरवेजने त्यांना दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

मुंबई : प्रीमियम क्लासचे बुकिंग करूनही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करायला लावल्याबद्दल मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजविरोधात तक्रार केली आहे. त्यांनी आलेला अनुभव ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नोंदवत आपल्या संतापाला वाट करून दिली. भिडे यांच्या तक्रारीनंतर ब्रिटिश एअरवेजने त्यांना दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

‘ही तुमची फसवणूक करण्याची पद्धत आहे की भेदभाव करण्याची वंशवादी वृत्ती आहे,’ अशी तिखट प्रतिक्रिया भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजविरोधात नोंदविली आहे. भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजचे प्रीमियम क्लासचे तिकीट बुक केले होते. परंतु, चेक इन करताना त्यांना अतिरिक्त बुकिंग (ओव्हर बुकिंग) झाल्याचे कारण देत इकॉनॉमी क्लासने प्रवास करण्यास सांगण्यात आले. त्यांना तिकिटातील तफावत भरून देण्यासही नकार देण्यात आला.

हा अनुभव कथन करत, हा प्रकार अनेकदा होत असल्याचे मला सांगण्यात आल्याचे भिडे यांनी आपल्या समाजमाध्यमावरील तक्रारीत नोंदविले आहे. त्यांनी आपली तक्रार डीजीसीए आणि केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडेही नोंदविली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर इतर प्रवाशांनीही ब्रिटिश एअरवेजबाबत आलेले अनुभव नोंदविले.

टॅग्स :मुंबईविमान