Iqbal Mirchi Property Case; DHFL's Kapil Wadhwal arrested by ED | इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण; ‘डीएचएफएल’च्या कपिल वाधवाला ईडीकडून अटक
इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण; ‘डीएचएफएल’च्या कपिल वाधवाला ईडीकडून अटक

मुंबई : कार्पोरेट क्षेत्रात मोठे नाव असलेल्या दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा (डीएचएफएल) चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा याला सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. कुख्यात मृत गँगस्टर इक्बाल
मिर्ची याच्या मालमत्ता विक्री गैरव्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
इक्बाल मिर्चीच्या देशातील व परदेशातील मालमत्ता विक्री प्रकरणी ईडीने सहा महिन्यांपूर्वी मनी लॉण्ंिड्रगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत कपिल वाधवा याचा भाऊ व डीएचएफएलचा प्रमोटर धीरज वाधवा याच्यासह अनेकांना अटक झाली आहे. त्याच्यासह डीएचएफएलशी संबंधित अनेक कंपन्या या गैरव्यवहारात गुंतल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
दलाल रणजितसिंह बिंद्रा आणि हुमायू मर्चंट यांच्या अटकेनंतर मिर्चीच्या मुंबई व देशविदेशातील अनेक ठिकाणची मालमत्ता विक्री प्रकरणाचा छडा लागला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी कपिल वाधवा याच्याकडे सखोल चौकशी केली होती. मिर्ची याच्या मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी सनब्लिंक रियल इस्टेट याच्याबरोबर केलेल्या सौद्याबद्दल त्याने ५ कोटी रुपये घेतल्याची माहिती दलाल मर्चंट याच्या जबाबातून पुढे आली होती. या कंपनीला २,१८६ कोटी कर्ज देण्यात आले होते. त्याबाबत तो समाधानकारक उत्तरे देऊ न शकला नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी त्याला पाचारण करून अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करून ७ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र दोन दिवसांची कोठडी मंजूर झाली.
अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटचा साथीदार व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्ची याचे फरार असताना परदेशात निधन झाले. त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या वेगवेगळ्या सात ठिकाणच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत ६०० कोटींच्या घरात आहे.

Web Title: Iqbal Mirchi Property Case; DHFL's Kapil Wadhwal arrested by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.