जलविद्युत प्रकल्पांत ३१,९५५ कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:47 IST2025-07-16T07:46:49+5:302025-07-16T07:47:29+5:30
नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळेल. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जलविद्युत प्रकल्पांत ३१,९५५ कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जलसंपदा विभागाने महत्त्वाचे चार सामंजस्य करार केले. यानुसार राज्यात ३१,९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून ६,४५० मेगावॅट वीजनिर्मितीबरोबरच १५ हजार रोजगारही निर्माण होणार आहेत.
या करारांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळेल. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण विकास महामंडळ) गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.
असे आहेत करार
ग्रीनको एमएच-०१ आयआरईपी प्रा. लिमिटेड - नायगाव उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर - २ हजार मेगावॅट, गुंतवणूक २ हजार कोटी रु., रोजगार निर्मिती - ६ हजार
ऋत्विक कोल्हापूर पीएसपी प्रा. लिमिटेड - कोल्हापूर उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, क्षमता १२०० मेगावॅट, गुंतवणूक ७४०५ कोटी रु., रोजगार निर्मिती २६००.
अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड - अडनदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. चिखलदरा, जि. अमरावती, क्षमता १५०० मेगावॅट, गुंतवणूक ८२५० कोटी रु., रोजगार निर्मिती ४८००.
मे. वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड - कासारी- मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प, ता. लांजा, जि. रत्नागिरी, क्षमता १७५० मेगावॅट, गुंतवणूक ६७०० कोटी रु., रोजगार निर्मिती १६००.