Join us

कॉर्डिलिया प्रकरणी समीर वानखेडेंविरोधातील तपास तीन महिन्यांत पूर्ण करू; सीबीआयची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:03 IST

सीबीआयला तपास पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर न्यायालयाने वानखेडे यांची याचिका दाखल करून घेतली

मुंबई - कॉर्डेलिया क्रुझ लाचखोरी प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातील तपास तीन महिन्यांत पूर्ण करू, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

क्रुझ ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानही आरोपी आहे. त्याला सोडविण्यासाठी शाहरूख खानकडून लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे आणि सीबीआयने याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे. एफआयआर रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुरू होती.

सीबीआयचे वकील कुलदीप  पाटील यांनी ३ महिन्यांत तपास पूर्ण करू, असे न्यायालयाला सांगितले. तर वानखेडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी न्यायालयाला सांगितले की, तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत आहे. दोन वर्ष प्रकरण तसेच प्रलंबित आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या करिअर परिणाम होत आहे. त्यांचे प्रमोशन रोखण्यात आले आहे. 

सीबीआयला तपास पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर न्यायालयाने वानखेडे यांची याचिका दाखल करून घेतली आणि त्यांना याआधी अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले. दरम्यान, सीबीआय आरोपपत्र दाखल करू शकते. तत्पूर्वी न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :समीर वानखेडेगुन्हा अन्वेषण विभाग