Join us

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 08:16 IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळ करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व आपल्या पतीच्या वतीने काही गुंड आपल्यावर सतत नजर ठेवून असतात व आपला मानसिक छळ करतात, अशी तक्रार एका ३६ वर्षीय महिलेने केली. या तक्रारीनुसार चौकशी करा. २४ जूनपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिले.

मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या महिलेने फेब्रुवारीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळ करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. याचिका दाखल केल्यावर तिला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली. तिची पीएच.डी.ची डिग्री बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे, असे याचिकाकर्तीच्या वकील आभा सिंग यांनी सांगितले. याचिकाकर्ती गेले १२ दिवस कारागृहात आहे. तिने याचिका दाखल केल्यावर पोलीस तिच्यामागे लागले, असे सिंग म्हणाल्या.

त्यावर न्यायालयाने अटकेबाबत स्वतंत्र याचिका दाखल करता येईल, असे म्हटले. याचिकाकर्तीच्या तक्रारीत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे आणि योग्य ती पावले उचलावीत. त्यांनी २४ जूनपर्यंत यासंबंधी अहवाल दाखल करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, मार्चमधील सुनावणीत राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी सर्व आरोप फेटाळले हाेते. याचिकाकर्ती राऊत यांची फॅमिली फ्रेंड असून त्यांना मुलीप्रमाणे आहे, असे स्पष्ट केले हाेते. 

टॅग्स :संजय राऊतन्यायालय