आयुक्तांच्या दालनात घुसखोरी? उंदीरमामांची खैर नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:43 IST2025-12-29T12:43:30+5:302025-12-29T12:43:39+5:30
केवळ या एकाच कारणामुळे नाही, तर उंदरांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाला सगळ्या मुंबईभर ‘पिंजरे’ लावावे लागत आहेत.

आयुक्तांच्या दालनात घुसखोरी? उंदीरमामांची खैर नाही...
जयंत हाेवाळ, विशेष प्रतिनिधी
पिपांत मेले ओल्या उंदीर
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण...
कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांची ही कविता सामाजिक अन्यायावरचा संताप, व्यवस्थेवरील कठोर टीका आणि माणसाच्या असहाय्यतेचे दर्शन घडविते. मुंबई महापालिकेला मात्र ‘पिपांत’ पडलेल्या उंदरांविषयी अशी असहाय्य भूमिका घेता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्या मुंबईतच नव्हे; तर आता खुद्द मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनातही उंदीर घुसखोरी करू लागले आहेत. केवळ या एकाच कारणामुळे नाही, तर उंदरांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाला सगळ्या मुंबईभर ‘पिंजरे’ लावावे लागत आहेत.
दर महिन्याला सुमारे साडेचार हजार उंदीर पालिकेला ‘बुडवून’ मारावे लागतात, अर्थात त्यांचा नायनाट करावा लागतो. त्यासाठी प्रसांगी ‘मेलेल्या उंदराची शेपटी दाखवा, अमुक एवढे पैसे मिळवा’, असे उपक्रमही राबवावे लागतात. उंदरांचा नायनाट करण्यासाठी पालिकेला वर्षाला सुमारे एक कोटी रुपये खर्च करावे लागतात, असा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबईच्या सर्व वॉर्डांत उंदीर नियंत्रण कक्ष आहे. यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतोच, शिवाय खासगी संस्थांचीही मदत घेतली जाते. पालिकेचे कर्मचारी दिवसाला किमान १५० उंदीर मारतात. म्हणजे महिन्याला साडेचार हजार उंदरांचा खात्मा केला जातो. १२ डिसेंबर रोजी एकाच दिवसात १,४०० उंदीर मारले गेल्याची माहिती कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्याने दिली. उंदीर मारण्याचे कंत्राट ज्या संस्थेला दिले होते त्यांनी दर महिन्याला चार हजार उंदीर मारल्याचे सांगण्यात आले. एक उंदीर मारण्यासाठी खासगी व्यक्तींना २२ ते २३ रुपये दिले जातात.
असे मारले जातात उंदीर
पिंजरे लावून उंदीर पकडले जातात, किंवा बिळात विषारी गोळ्या टाकून मारले जाते. पिंजऱ्यात फेविक्विक (ग्ल्यु) सारखा पदार्थ टाकून उंदरांना चिकटवून मारण्याची पद्धतही होती. नंतर ती बंद झाली. उंदीर रात्रीच्या वेळी मारले जातात. रात्री ते खाद्याच्या शोधात बिळातून बाहेत पडतात. त्यामुळे त्यांना शोधणे सोपे जाते.
काही वेळेस त्यांच्या बिळावर टॉर्च मारून त्यांना बाहेर येण्यास भाग पडले जाते. ते बाहेर आले की, लाकडाचा फटका मारून ठार केले जाते. मारल्या गेलेल्या उंदरांची (सर्व नाही) तपासणी होते. कोणत्या उंदरात प्लेगसदृश रोग आहे का, हे तपासले जाते. त्यानंतर मारल्या गेलेल्या उंदरांना डम्पिंग ग्राउंडवर खड्डा खोदून पुरले जाते. पूर्वी हाफकिन येथील भट्टीत त्यांना जाळले जात असे. मात्र ती भट्टी बंद झाल्यापासून पुरतात.
उंदीर मारण्यात घोटाळा?
महापालिकेने जून २०२५ आधीच्या सहा महिन्यात अडीच लाख उंदरांचा खात्मा केला ही आकडेवारी वादात सापडली होती. उंदीर किती मारले? मारलेले उंदीर कुठे टाकले? किती विभागात कारवाई झाली? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का? असे प्रश्न उपस्थित झाले. प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून ३ महिन्यांत अहवाल सादर करा, असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले.
जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४
या कालावधीत ४.४० लाख उंदीर मारण्यात आले तर, जानेवारी २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत ४.३४ लाख उंदीर मारले, अशी पालिकेची आकडेवारी सांगते.