Introduce students with rich historical heritage - Governor | विद्यार्थ्यांना समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून द्यावी - राज्यपाल

विद्यार्थ्यांना समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून द्यावी - राज्यपाल

मुंबई : मुंबई शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विद्यापीठाने पुढे येऊन विद्यार्थ्यांना वारसा चळवळीत सहभागी करून घ्यावे. विद्यापीठामार्फत शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या मदतीने ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना समृद्ध ऐतिहासिक वारसाची ओळख करून देण्याची गरज असल्याचे मत राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
युनेस्कोतर्फे घोषित करण्यात आलेल्या आशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशनचा बहुमान मुंबई विद्यापीठाला प्राप्त झाला. हा पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात राज्यपालांनी आपले मत व्यक्त केले. मुंबई विद्यापीठ, समस्त नागरिक आणि वारसाप्रेमींच्या वतीने हा अवॉर्ड स्वीकारताना अत्यंत आनंद होत असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे, युनेस्कोचे संचालक एरीक फाल्ट, टीसीएसचे एन. जी. सुब्रमनिअम, डॉ. ब्रिंदा सोमय्या, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबईमध्ये जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, एलिफंटा केव्हज्, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, डेविड ससून लायब्ररी आदी अनेक वास्तू आहेत. यासोबतच शासकीय निवासस्थाने, बंदरे, किल्ले, डॉक्स, एशियाटीक लायब्ररी, कस्टम हाउस, बॅलॉर्ड इस्टेट, उच्च न्यायालयाच्या इमारती आदी अनेक वास्तू मुंबईच्या ऐतिहासिक संस्कृतीच्या साक्षीदार आहेत. यापैकी अनेक इमारतींचे जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे तर काही वास्तूंची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे या वास्तूंपैकी काही निवडक वास्तू विकसित करून मुंबई शहरामध्ये हेरिटेज टुरिजम सुरू करण्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, मुंबईच्या सांस्कृतिक कलेचा वारसा जोपासलेल्या या वास्तूंची ओळख मुंबईकरांना नव्याने करून देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेऊन हेरिटेज लिटरसीच्या नवीन उपक्रमाला प्रारंभ करावा व याची सुरुवात युनेस्कोने सन्मानित केलेल्या राजाबाई टॉवर या ऐतिहासिक व पुरातन वास्तूपासून करावी, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केली.

‘हेरिटेज पर्यटनाला चालना देण्याची गरज’
युनेस्कोचे संचालक एरीक फाल्ट यांनी भारतात एकूण ३८ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू असून त्यापैकी राजाबाई क्लॉक टॉवर आणि ग्रंथालय इमारत ही एक असून अत्यंत उत्कृष्टरीत्या या वास्तूंचा जीर्णोद्धार केला आहे. भारताला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून त्याची शास्त्रोक्त मांडणी करून हेरिटेज पर्यटनाला चालना देण्याचीही गरज असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

Web Title: Introduce students with rich historical heritage - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.