International Yoga Day: नगरसेवक म्हणतात, योग करण्यासाठी वेळ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 01:03 AM2019-06-21T01:03:04+5:302019-06-21T07:04:50+5:30

लोकमत सर्वेक्षण : जनसेवा करता करता होतो योग; शहरातील विविध भागांत योग शिबिराचे आयोजन

International Yoga Day: Corporators say there is no time to do yoga | International Yoga Day: नगरसेवक म्हणतात, योग करण्यासाठी वेळ नाही

International Yoga Day: नगरसेवक म्हणतात, योग करण्यासाठी वेळ नाही

googlenewsNext

मुंबई : धकाधकीच्या जीवनात शारीरिक व मानसिकदृष्ट्या समक्ष राहण्यासाठी नियमित योग करणे हा उत्तम उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योग साधनेला जागतिक स्तरावर स्थान मिळवून दिल्यानंतर योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारतीय योग विद्या आणि त्याचे फायदे देशाबरोबरच जगाला पटले. व्यायाम करणारे अनेक आहेत. पण सकाळी नियमित योग करणारे मोजकेच आहेत. कायम धावपळीत असलेल्या नगरसेवकाला मात्र तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज योगाचा मुहूर्त गाठता येतो का? याबाबत लोकमतने केलेले हे सर्वेक्षण...

मुंबईतील २२७ प्रभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांना योगाचे महत्त्व व फायदे चांगलेच माहीत आहेत. पण बहुतांशी नगरसेवकांमध्ये योग करण्याबाबत उदासीनता आहे. योग करण्यासाठी वेळ कुठे? असे ७५ टक्के नगरसेवक म्हणतात. यापैकी बहुतांशी नगरसेवकांच्या मते प्रभागात दररोज मारलेला फेरफटका व लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेली पायपीट म्हणजेच त्यांचा व्यायाम आहे. दररोज प्रभागातील लोकांच्या भेटीगाठी, नागरी समस्या सोडविण्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा अशातच वेळ निघून जातो. मग योग साधनेसाठी वेळ काढायचा कसा? असा त्यांचा सवाल आहे. तर योग शिकवण्यासाठी चक्क प्रशिक्षक नेमणारेही काही नगरसेवक आहेत. अशा काही नगरसेवकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया...

हर्षिता नार्वेकर - योग केल्यानंतर दिवसाची सुरूवातच प्रसन्न होते. त्यामुळे दररोज सकाळी योग करतेच.
मीनल पटेल - योगाचे शिक्षण घेतले आहे. परंतु, पाच वर्षांचा मुलगा व एकत्र कुटुंबाची जबाबदारी यातून वेळच मिळत नाही. त्यामुळे जेवढ शक्य होईल तितकं रोज चालते.
सोनम जामसूतकर - दररोज सकाळी ५.३० ते ६.३० असा एक तास योग..तसेच सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी उठून काहीवेळ चालते.
ऊर्मिला पांचाळ - योग आवश्यक आहे. पण तेवढा वेळच मिळत नाही. सकाळीच प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी बाहेर पडल्यानंतर घरी परत येण्यास उशीर होतो. मग व्यायाम करण्याचे त्राणच राहत नाहीत.
सचिन पडवळ - कितीही व्यस्त असलो तरी फिट राहण्यासाठी योग करायलाचं हवा. त्यामुळे थोडा वेळ काढून चालतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. कंटाळा येत नाही आणि कामही पटापट होताता. सकारात्मक वाटते.
रवि राजा (विरोधी पक्षनेते) - माझी पत्नी गेली १५ वर्षे योग साधना करीत आहे. पाच वर्षांपूर्वी मी पण दररोज योग करण्यास सुरूवात केली. आता नियमित पहाटे पाच वाजता योगाचा क्लास भरतो. यासाठी खास प्रशिक्षकचं घरात बोलावले आहेत.
मिलिंद वैद्य - व्यस्त दिनक्रमामुळे योग करणे शक्य होत नाही, पण त्याचे महत्व माहिती आहे. म्हणून चालण्यावर भर देतो. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली दररोजची पायपीठ हेच माझे व्यायाम.
सदानंद परब - तसा वेळ मिळत नाही. पण सकाळी उठाना काही छोटी आसनं पाच मिनिटांसाठी करतो.
अरूंधती दुधवडकर - योग करणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रभागात फिरतानाच चालण्याचा व्यायाम होऊन जातो.
पंकज यादव - जागतिक योग दिनानिमित्त शुक्रवारपासून सायं ६.३० ते ९.०० या वेळेत जोगेश्वरी पूर्व येथे जेइएस शाळेत योग दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच नियमित प्राणायाम करण्यावरही माझा भर असतो.
 

Web Title: International Yoga Day: Corporators say there is no time to do yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.