जागतिक मातृदिन विशेष: आई, तू केवळ जन्मच देत नाहीस, तर कधी देशाला पुत्रही अर्पण करतेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 09:17 IST2025-05-11T09:16:22+5:302025-05-11T09:17:16+5:30
वीरमातांच्या डोळ्यातून अभिमानाचं पाणी

जागतिक मातृदिन विशेष: आई, तू केवळ जन्मच देत नाहीस, तर कधी देशाला पुत्रही अर्पण करतेस
मुंबई : आई म्हणजे निस्सीम माया, त्याग आणि शक्तीचा अद्वितीय संगम, पण कधी-कधी याच आईवर आपल्या लेकरांना देशासाठी अर्पण करण्याची वेळ येते. साताऱ्याचे सूरज मोहिते, कोल्हापूरचे दिगंबर उलपे, चिपळूणचे अजय ढगळे आणि सांगलीचे नितीन कोळी हे सर्व जण आपल्या मातृभूमीसाठी शहीद झाले. आज डोळ्यात आठवणींनी अश्रू दाटत असले तरी त्या वीरमातांचे डोके अभिमानाने उंचावलेले आहे. काळजाचा तुकडा हिरावला, तरी चेहऱ्यावर तक्रार नाही, अशा वीरमातांच्या अश्रूमध्ये वेदनाही आहे आणि विजयाचा तेजस्वी प्रकाशही. मातृत्वाची खरी व्याख्या या मातांनी जगासमोर उभी केली आहे. ती धैर्य, समर्पण आणि मातृभूमीवरील निष्ठेतून.
अनेक जवान कर्तव्यावर हजर होण्यासाठी रवाना
सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता, सुटीवर आलेल्या भारतीय जवानांना पुन्हा हजर राहण्याचा आदेश देण्यात आले. त्यामुळे विविध जिल्ह्यांमधून गेल्या दोन दिवसात अनेक जवान कर्तव्यावर हजर होण्यासाठी खाना झाले आहेत. यावेळी ग्रामस्थांनी 'भारत माता की जय' असे नारे देत जवानांप्रती अभिमान व्यक्त केला.
शुक्रवारी कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी बर्गेवाडीतील १२ जवान युद्धभूमीकडे रवाना झाले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन पेढे भरवून औक्षण करून त्यांनी निरोप दिला. एक जवान सुटी घेऊन घरी आला. एक दिवस राहिल्यानंतर त्याला तातडीने युनिटमध्ये हजर राहण्याचा आदेश आला. यावेळी त्याच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले.
हंबरूनी वासराले चाटती जवा गाय...; शस्त्रसंधीनंतरही गणेश कर्तव्यावर
जातेगाव (जि. बीड) : एक महिन्याच्या सुटीवर गावी आलेल्या सीआरपीएफ जवान गणेश वारे याची सुटी संपण्यास आठ दिवसांचा कालावधी असताना युद्धजन्य स्थितीमुळे त्याला आधीच जावे लागले. निरोप देताना आई-वडिलांचा कंठ दाटून आला तर ग्रामस्थ व मित्र भावनिक झाले होते. दुपारनंतर शस्त्रसंधीचे वृत्त समजले. तरीही गणेश कर्तव्यावर रुजू होण्यासाठी रवाना झाला. गेवराई तालुक्यातील जातेगावलगतच्या श्रीरामनगर वस्तीवरील सैनिक गणेश याला बोलावणे आल्याने काश्मीर भागातील श्रीनगर बडगाम येथे रुजू होण्यासाठी शनिवारी तो रवाना झाला. देशसेवा ही श्रेष्ठ सेवा असल्याने निरोप देताना आई प्रभावती आणि वडील बबन वारे यांचा ऊर अभिमानाने भरून आला. दोघेही भावुक झाले होते. गावातून कर्तव्याच्या दिशेने प्रवास सुरू करताना ग्रामस्थ व मित्रांनाही त्याचा अभिमान वाटत होता.
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय...; मंदा निंबारते यांच्या धैर्याला सलाम
नागपूर : देशाच्या सीमेवर रणभूमीत झुंजणाऱ्या प्रत्येक जवानामागे एक धैर्यवान आई उभी असते. काळजीने झुरणारी, पण अभिमानाने उर भरून येणारी. अशीच एक आई आहे कुही तालुक्यातील राजोला गावातील मंदा निंबारते. त्यांचा सुपुत्र प्रमोद सध्या देशाच्या सीमेवर शत्रूचा मुकाबला करत आहे. प्रमोद अवघा १७ वर्षांचा असतानाच त्याने भारतीय सेनेत प्रवेश केला. त्याचे वडील अशोक आणि आई मंदा दोघेही शेतमजुरी करून संसार चालवतात. गरिबी असूनही मंदा निंबारते यांनी आपल्या मुलासाठी मोठे स्वप्न पाहिले. तो मोठा व्हावा, नाव कमवावं आणि देशसेवेचं भाग्य लाभावं. हे स्वप्न फक्त स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांनी जिद्दीनं प्रयत्न केले. शैक्षणिक गरजा असोत की, भरतीसाठी लागणारी तयारी, मंदाताईंनी कधीच मागे पाहिलं नाही. आज प्रमोद सीमारेषेवर उभा आहे, बंदूक खांद्यावर घेऊन शत्रूशी दोन हात करायला सज्ज आहे. त्याच्या या देशभक्तीच्या प्रवासात त्याच्या आईची प्रेरणा आणि त्याग मोलाचा ठरला आहे. मातृ दिनाच्या निमित्ताने मंदा निंबारते यांच्या या धैर्याला, त्यागाला आणि अमर प्रेमाला मनापासून सलाम!