Join us  

निरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 1:05 PM

मुंबई काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे संकटात सापडलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. राहुल यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काल ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा आणि मिलिंद देवरांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस देवरांनी राजीनामा देताना केली. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यानं तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं देवरा यांनी राजीनाम्यात म्हटलं. मात्र यासोबतच त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली.मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली. राजीनाम्यात त्यागाची भावना असते. मात्र इथे तर दुसऱ्या क्षणाला राष्ट्रीय स्तरावर पदाची मागणी केली जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी?, असा सवाल निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला. निरुपम यांच्या ट्विटला काँग्रेस नेते भाई जगताप यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं. काही जण काँग्रेसी असल्याचा दावा करतात. मात्र जातीवाद, भाषावादाचं राजकारण करतात. ते इतर नेत्यांचा अपमान करतात आणि नंतर त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढतात. मात्र तरीही 2.7 लाख मतांनी पराभूत होतात. अशा नेत्यांपासून सावध राहायला हवं, असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :काँग्रेससंजय निरुपमराहुल गांधीलोकसभा निवडणूक २०१९