Join us  

कशाला हवी 'महाशिवआघाडी'?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना आमदारांमध्येच झाली 'खडाखडी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 6:16 PM

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटात देखील नाराजी असल्याचे समोर आले आहे.

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटात देखील नाराजी असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला भाजपाने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेना केला. त्यामुळे भाजपासोबत युतीची चर्चा बंद करुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली आहे.

शिवसेना आमदारांकडून कोणतीही दगाबाजी होऊ नये यासाठी सर्व आमदारांना जवळपास पाच ते सहा दिवस रिट्रिट हॅाटेलमध्ये ठेवण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा सर्व आमदारांना भेटण्यासाठी रिट्रिट हॅाटेलमध्ये गेले असताना शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नाराजी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

आता भाजपा म्हणतेय, 'ठरल्याप्रमाणे करा'; शिवसेना म्हणतेय, 'तसं ठरलंच नव्हतं'!

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेच्या काही आमदारांनी निवडणुकीत ज्या पक्षांच्या विरोधात आपण आवाज उठवला, टीका केली आणि आता त्याच पक्षांसोबत कसं जायचं असा सवाल उपस्थित करत नाराजी दर्शविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास नसल्याचे देखील आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगून दाखविले होते. 

शिवसेनेने अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेली भूमिका आमदारांना फारशी पटली नसल्याचं या शाब्दिक चकमकीतून स्पष्ट जाणवत होतं. तसेच अनेक दिवसांपासून आमदारांना हॅाटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याने अजून किती दिवस आम्हाला हॅाटेलमध्ये ठेवणार असा सवाल देखील उद्धव ठाकरेंसमोर उपस्थित केला.  त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची नाराजी दूर करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दूसऱ्या दिवशी सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्यास सांगितलं असल्याचे टाइम्स नाऊच्या वृत्तामधून समोर आले आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही याचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे.

तसेच राज्यातील सत्तास्थापनेवर दिल्लीतील हालचालींना वेग आलेला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सत्रासाठी राज्यातील अनेक नेते दिल्लीत आहे. त्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठीमुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेने भाजपासोबत जुळवून घ्यावं असं रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपाशिवसेनाआदित्य ठाकरे