इंटरसेप्टर वाहनांचा लवकरच वापर; २०० इन्स्पेक्टरचे नवीन प्रणालीसाठी प्रशिक्षण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:43 IST2025-11-26T06:25:41+5:302025-11-26T06:43:38+5:30
रडार सिस्टिममध्ये बॅटरी बसवली असून त्याचे वाहन यंत्रणेसोबत एकत्रीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकारी म्हणाले.

इंटरसेप्टर वाहनांचा लवकरच वापर; २०० इन्स्पेक्टरचे नवीन प्रणालीसाठी प्रशिक्षण पूर्ण
मुंबई - राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांची हाताळणी करण्यासाठी राज्यभरातील २०० इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना देण्यात आलेली ६९ इंटरसेप्टर वाहने वापराशिवाय धूळखात पडल्याची बातमी ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.
रडार सिस्टिममध्ये बॅटरी बसवली असून त्याचे वाहन यंत्रणेसोबत एकत्रीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकारी म्हणाले. बेफिकीर चालकांवर नियंत्रण आणण्यासाठी गाड्यांचा वापर अपेक्षित असतानाही ही वाहने धूळखात पडून असल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची टीका होत होती. २१ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये कंत्राटदारामार्फत राज्यभरातील ५३ आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वयंचलित पद्धतीने २४ तास होणार कारवाई
पूर्वीच्या यंत्रणेमध्ये वापरण्यात येणारी उपकरणे हाताळावी लागायची. नवीन इंटरसेप्टर वाहनांवर रडार यंत्रणा, वायफाय आणि ‘एनपीआर कॅमेरा’ बसविण्यात आला आहे. या कॅमेरांमध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञान असल्याने रात्रीच्या वेळेसही कारवाई करता येणे शक्य होणार आहे. अधिकाऱ्यांना केवळ एक विशिष्ट भाग निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर रडार यंत्रणेच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन चालकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनांवर स्वयंचलित पद्धतीने दंड ठोठावण्यात येणार आहे.