Join us

सावरकरांचा अपमान; काँग्रेसच्या प्रियांक खर्गेंविरुद्ध मुंबईत भाजपयुमोचे तीव्र आंदोलन

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 8, 2023 14:47 IST

थोर स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान करणे हा देशाचा अपमान आहे. हा अपमान देश कदापी सहन करणार नाही

मुंबई - महाराष्ट्राचे वीर सुपुत्र, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते दररोज जाणूनबुजून अवमानकारक विधाने करतात. या मालिकेत राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे याने तुच्छ विधान करून सावरकरांसारख्या थोर क्रांतिकारकाचा अपमान केला आहे. 

थोर स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान करणे हा देशाचा अपमान आहे. हा अपमान देश कदापी सहन करणार नाही असा एल्गार करत भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो मुंबई तर्फे उत्तर मुंबई वीर सावरकर उद्यान (बोरिवली पश्चिम), उत्तर पश्चिम मुंबई गोरेगाव पश्चिम ( एम टी एनएल ब्रिज) दक्षिण मुंबई महाराष्ट्र भाजपा कार्यालय (नरीमन पॉइंट),दक्षिण मध्य मुंबई कैलास लस्सी जवळ (दादर पूर्व), ईशान्य मुंबई भांडुप स्टेशन पश्चिम,उत्तर-मध्य मुंबई विलेपार्ले जिल्हा कार्यालय या सहा ठिकाणी आज मुंबईतील ६ जिल्ह्यात जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या देशद्रोही, हिंदुद्रोही आणि प्रियांक खर्गे सारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्या देशद्रोही नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.भाजयुमो मुंबईने सहा ठिकाणी आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि भाजयुमो कार्यकर्ते सहभागी होऊन काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचे सर्व श्रेय एका विशिष्ट कुटुंबाला देऊन आजवर काँग्रेस पक्षाने देशाची लूट केली आहे.परंतू हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भारत आहे, हा नवा भारत आहे आणि भारत माता ही आमची आई आहे. भारताचे खरे सुपुत्र, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांचा यथोचित सन्मान दिला जाईल.स्वातंत्रवीर सावरकर हे आम्हा भारतीयांचा सन्मान असून काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात काहीही बोलण्याचा अधिकार नाही. वीर सावरकरांचा अपमान भारत कदापी खपवून घेणार नाही असे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना तिवाना यांनी ठणकावून सांगितले. 

टॅग्स :काँग्रेसभाजपामुंबई